शेकडो तरुण दाखल : खेळाडू, आजी-माजी सैनिकांच्या मुलांसाठी मेळावा : जीडी, टेड्समन, क्लार्क, स्टोअरकीपर, टेक्निकल पदे भरणार

प्रतिनिधी /बेळगाव
मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरतर्फे ‘अग्निवीर’अंतर्गत सोमवार दि. 19 पासून खेळाडू तसेच आजी-माजी सैनिकांच्या मुलांसाठी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अग्निवीर जनरल डय़ुटी, अग्निवीर टेड्समन, क्लार्क, स्टोअरकीपर, टेक्निकल या पदांसाठी भरती होणार आहे. अग्निवीर सैन्य भरतीतील पहिला मेळावा बेळगावमध्ये होत असल्याने अनेक युवकांना सैन्यामध्ये भरती होण्याची संधी मिळणार आहे. शेकडो तरुण रविवारी बेळगावमध्ये दाखल होत होते.
महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, छत्तीसगड, मध्यप्रदेश व गोवा या राज्यांतील युवकांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. कॅम्प येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्या शिवाजी स्टेडियमवर भरती होणार आहे. बस, रेल्वेने तरुण रविवारी शहरात दाखल होत होते. त्यामुळे कॅम्प परिसरात रात्री गर्दी झाली होती. सोमवारी पहाटे भरतीसाठी उपस्थित राहावे लागणार असल्याने तोपर्यंत रात्री मिळेल त्या ठिकाणी तरुण आराम करत होते. ‘अग्निवीर’अंतर्गत हा पहिलाच मेळावा होत असल्याने सर्वांचेच लक्ष याकडे लागले आहे.
19 रोजी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंसाठी भरती होणार आहे. 20 रोजी महाराष्ट्रातील अहमदनगर, अमरावती, औरंगाबाद, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई येथील उमेदवारांसाठी भरती होणार आहे. 21 रोजी नागपूर, नांदेड, नंदूरबार, नाशिक, उस्मानाबाद, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ येथील उमेदवारांसाठी भरती तर 22 रोजी मध्यप्रदेश, छत्तीसगड, गोवा व गुजरात येथील उमेदवारांसाठी भरती होईल.
23 रोजी कर्नाटक व आंध्रप्रदेशच्या उमेदवारांसाठी भरती होईल. 24 रोजी अग्निवीर टेड्समन पदासाठी, अग्निवीर क्लार्क, स्टोअरकीपर व टेक्निकल पदासाठी 26 रोजी भरती होईल. 17 वर्षे 6 महिने ते 23 वर्षे वयोमर्यादा असणाऱया युवकांना यामध्ये सहभागी होता येणार आहे.









