आजी-माजी सैनिकांच्या मुलांसाठी जून 30 पर्यंत भरती प्रक्रिया
बेळगाव : मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर येथे आजी-माजी सैनिकांच्या मुलांसाठी अग्निवीर सैन्य भरती प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये अग्निवीर जनरल ड्युटी, ट्रेड्समन, क्लार्क, स्टोअरकीपर, टेक्निकल या जागा भरल्या जाणार आहेत. 25 जूनपासून या प्रक्रियेला प्रारंभ झाला. सर्वप्रथम महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतील माजी सैनिकांच्या मुलांसाठी चाचणी झाली. दि. 27 रोजी महाराष्ट्रातीलच अन्य जिल्ह्यांसाठी चाचणी झाली. दि. 28 रोजी छत्तीसगड, गुजरात, गोवा, कर्नाटक व आंध्रप्रदेश येथील तरुणांसाठी अग्निवीर चाचणी घेण्यात आली. 30 जूनपर्यंत ही भरती प्रक्रिया सुरू राहणार आहे. या निमित्ताने तरुण इन्फंट्री येथे दाखल झाले आहेत. पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांच्या पडताळणीनंतर शारीरिक चाचणी घेण्यात येते. यामध्ये उत्तीर्ण झालेल्या तरुणांची वैद्यकीय चाचणी करून भरती प्रक्रियेत यशस्वी ठरल्यास त्यांची सामान्य परीक्षा घेतली जाणार आहे.









