विज्ञान असे म्हणते की, ऑक्सिजन म्हणजेच अग्नी. थोडा वेळ ऑक्सिजनचा अर्थात प्राणवायूचा पुरवठा मनुष्याच्या मेंदूला, हृदयाला किंवा शरीरातील इतर अवयवांना झाला नाही तर शरीर टीकत नाही. एवढेच कशाला देवघरात असलेल्या दिव्यावर जर काचेचा ग्लास उपडा घातला तर दिवाही विझतो. कारण त्याला ऑक्सिजन मिळत नाही.
श्री दत्त महाराजांनी जे चोवीस गुरू केले त्यात अग्नीला गुरू केले. श्री दत्तमहात्म्य तसेच द्विसाहस्री गुरूचरित्र ग्रंथामध्ये परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांनी पंचमहाभूतांतील अग्नीचे विवरण तसेच त्याबाबत प्रबोधन केले आहे. स्वामी म्हणतात, ‘अग्नी हा स्वयंप्रकाशित आहे. त्याची सेवा करणाऱ्यास आपोआपच त्याचे तेज प्राप्त होते. अग्नी आपल्या तेजाने अंधार आणि थंडी दोन्हीचा नाश करतो. अग्नी हा पृथ्वीवरील यजमान आणि स्वर्गामधील देव यांच्यातील दुवा तसेच निरोप पोहोचवणारा आहे. यज्ञामध्ये ज्या देवाचे नाव घेऊन आहुती अर्पण करतात त्या त्या देवतेला ती पोहोचवून भक्तांना तृप्त करतो तो अग्नी होय.’ परमात्मा हा निराकार निर्गुण आहे. त्याला आकार नसूनही तो साकार दिसतो, त्याचप्रमाणे पंचमहाभूतात्मक सारे जीव देहरूपाने साक्षात दिसत असले तरी देह क्षणभंगुर आहे. ज्याप्रमाणे अग्नी एखाद्या वस्तूमध्ये प्रकट झाला की त्याचेच रूप, आकार धारण करतो त्याप्रमाणे परमात्मा हा देखील निरनिराळ्या देहात साकार होतो. दत्तगुरू म्हणतात, देह हा नश्वर आहे हे सत्य जाणून घेण्यासाठी मी अग्नीच्या ज्वालेला गुरू केले. ज्वाला क्षणात पेट घेते आणि तशीच क्षणात विझूनही जाते. पेटणे, नाश पावणे याला विलंब लागत नाही. त्याचप्रमाणे पंचमहाभूतांपासून देह उत्पन्न होणे व नष्ट होणे याला सुद्धा वेळ लागत नाही. अग्नीचा विशेष गुण म्हणजे अग्नी संग्रह करीत नाही. स्वामी म्हणतात, साधकाने संग्रह करू नये. स्वामी महाराजांची वृत्ती ही निस्संग असल्यामुळे ते पूर्वीपासून संग्रह करीत नसत. वासुदेवानंद सरस्वती स्वामींनी गृहस्थाश्रमाचा त्याग करून श्री दत्तप्रभूंच्या आज्ञेने परमहंस परिव्राजकाचार्य नारायणानंद स्वामींकडून दंड ग्रहण केल्यानंतर तर संग्रह करण्याचा प्रश्नच नव्हता. स्वामींजवळ भारतभ्रमण करीत असताना मोजक्या वस्तू असत. स्वामींनी दऊत आणि लेखणी यांचा संग्रह केला हे समाजाचे भाग्य. एवढी अफाट वाड्.मयसंपदा त्यामुळे समाजाला प्राप्त झाली. स्वामी समोर आलेल्या सर्व वस्तू तिथल्या तिथे वाटून टाकत. अग्नीची शिकवण स्वामी महाराजांनी आचरणात आणली. श्री दत्तमहात्म्य या ग्रंथात स्वामी म्हणतात, ‘अग्नी जसा धगधगत राहतो त्याप्रमाणे योग्याने तपोरत असावे. त्या तपाच्या तेजाने लोकांमध्ये प्रदीप्त दिसावे. लोकांना ज्ञानाचा प्रकाश द्यावा. संसाराची थंडी घालवून मायेची ऊब द्यावी.’
स्वामी महाराजांकडे सामान्यांपासून मुमुक्षू साधकांपर्यंत अनेक लोक येत असत. विज्ञान असे म्हणते की, ऑक्सिजन म्हणजेच अग्नी. थोडा वेळ ऑक्सिजनचा अर्थात प्राणवायूचा पुरवठा मनुष्याच्या मेंदूला, हृदयाला किंवा शरीरातील इतर अवयवांना झाला नाही तर शरीर टिकत नाही. एवढेच कशाला देवघरात असलेल्या दिव्यावर जर काचेचा ग्लास उपडा घातला तर दिवाही विझतो. कारण त्याला ऑक्सिजन मिळत नाही. म्हातारी माणसे आजारपणात अंगावरील वस्त्रं काढून टाकतात. शक्यतो कमी वस्त्रं ते ठेवतात. कारण माणसाच्या शरीरातील छिद्र न् छिद्र श्वास घेत असते. म्हातारपणी नाकातून श्वास घेण्याची शक्ती कमी होत जाते, म्हणून श्वास जिथून मिळेल तिथून घेण्याचा माणूस प्रयत्न करतो. पृथ्वीच्या पोटात, वनस्पतींमध्ये, कणाकणात अग्नी आहे. जलात वडवानल आहेच. वायूशिवाय बाष्प संभवत नाही. अग्नी प्रकट होतो तो आकाशात. याचा अर्थ पंचमहाभूतामधले महातत्त्व आहे ते. अगदी प्राचीन काळापासून आपल्याकडे अग्नीची पूजा होते. अनेक घरांत अग्निहोत्र पेटलेले असते. श्री क्षेत्र गिरनार येथे आठ हजार पायऱ्या चढून गेल्यानंतर कमंडलू कुंड लागते. तेथे अगणित काळापासून अग्निकुंड धगधगते आहे. श्री दत्तमहाराज अग्नीचे प्रधान रूप आहे. भारतामध्ये अग्निपूजा हेच जगण्याचे मूलतत्त्व आहे. माणसाच्या शरीरातील अग्नी अन्नपचन सुलभ करतो. स्मरण लख्ख ठेवतो. कायाग्नी, नामाग्नी ही अग्नीचीच रूपे आहेत. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींना अग्नितत्व स्वाधीन होते. एकदा मंडलेश्वर इथे असताना स्वामींना रोज ताप येऊ लागला. स्वामींनी आपले स्नानादिक विधी मात्र यासाठी बंद केले नाहीत. काही मंडळी महाराजांकडून पाठ ऐकण्याकरिता येऊन बसली की स्वामींना थंडी वाजू लागे. त्यावेळी ते मंडळींना म्हणत, आपण थोडा वेळ बसा. हे हिव घालवून येतो. नंतर निजण्याच्या खोलीत जाऊन प्राणायाम करत आणि थंडी घालवून लवकरच बाहेर येत. पाठ बंद झाला असे कधीही झाले नाही. लोक म्हणत, महाराज आज अंगात ताप आहे तेव्हा पाठ राहू द्या. महाराज म्हणत की ताप तर रोजचाच आहे. तो येईना का, भोग संपला की जाईल बापडा. महाराजांनी समाजातील व्याधीग्रस्त लोकांना औषधे देऊन निरोगी केले; परंतु स्वत: मात्र दत्तनामाशिवाय कुठलेही औषध घेतले नाही. स्वामी तापात अन्न घेत असत याचे त्याकाळी लोकांना आश्चर्य वाटे. महाराज म्हणत, तापाचा आणि अन्नाचा काय संबंध? आपण अन्न सेवन केले पाहिजे. या उपदेशाने पुढे त्यांचे शिष्य त्यांचे अनुकरण करत. अग्नितत्वावर प्रभुत्व असल्यामुळे ज्वर हा त्यांना नेहमी वचकून होता.
कठोपनिषदामध्ये असलेल्या सातव्या आणि आठव्या मंत्राचा भावार्थ असा आहे. दारी आलेला अतिथी हा साक्षात वैश्वानर म्हणजे अग्निस्वरूपच असतो. ज्याच्या घरी अतिथी उपाशी राहतो त्याचे यज्ञ, पूजा, सत्यभाषण, दानधर्म इत्यादी इष्ट व पूर्त फळ यांचा नाश होतो. दुपारच्या वेळी दारी आलेला भिक्षेकरी हा दत्तस्वरूप असतो असे आजच्या काळातही समाज मानतो. उपनिषदामध्येही अतिथीपूजा, अग्निपूजा मानलेली आहे. हिंदू धर्मामध्ये सर्व प्राण्यांच्या भुकेचा विचार केला आहे. गोग्रास, काकबळी, चित्राहुती यात प्राण्यांचा, अगदी किडा-मुंगीचाही विचार आहे. श्रीमद् भगवद् गीतेमध्ये म्हटले आहे-
‘मी वैश्वानररूपाने प्राणीमात्रात राहुनी,
अन्ने ती पचवी चारी, प्राणापानास फुंकुनी..’
(गीताई)
सर्व प्राण्यांच्या उदरात मी अग्निरूपाने निवास करतो. खूप भूक लागली की माणूस सहजच म्हणतो, पोटात आगीचा डोंब उसळला आहे. भुकेची आग साऱ्यांना अस्वस्थ करते, म्हणून दारी आलेल्या कोणत्याही जिवाला मग तो मनुष्य असो वा पशुपक्षी, कीटक यांना उपाशी पाठवू नये. तसे केले तर आयुष्यभर केलेल्या सर्व सद् कृत्यांवर पाणी पडते. आत्मोन्नती साधणे तर दूरच राहिले. सर्व संतांनी अन्नदानावर म्हणूनच भर दिला आहे.
स्वामी महाराजांचा एकोणिसावा चातुर्मास विदर्भातील पवनी येथे होता. त्यावेळी काहीनाकाही कारणांनी स्वामींना तीन दिवस उपास घडला. तिसऱ्या दिवसानंतर स्वामी एका गृहस्थांकडे भिक्षेला गेले असता त्यांनी स्वामींची फारच चौकशी चालवली हे बघून स्वामी म्हणाले, आलेल्या अतिथीस भिक्षा घालणे एवढेच गृहस्थाचे काम आहे. जास्त विचारपूस करू नये. स्वामींचा बाविसावा चातुर्मास चिखलदा येथे सुरू असताना एक दिवस कोठीघराच्या बाहेर दारातच एक मिरची पडलेली स्वामींना दिसली. स्वामींनी ती उचलून कोठीवाल्याकडे देऊन सांगितले की ही दत्ताच्या कोठडीतील मिरची वाया जाणे चांगले नाही. व्यवहार आणि परमार्थ या दोन्ही गोष्टींमध्ये दक्ष असले पाहिजे हा स्वामींचा उपदेश सद्य काळातही तेवढाच लागू आहे. एकदा स्वामी महाराज बद्रीनारायण येथे यात्रेला गेले होते. एक दिवस स्वामींबरोबर असलेली मंडळी पुढे निघून गेली आणि स्वत:ची सोय चहूकडून बंद असलेल्या जागेत करून घेतली. दोन तासांनी जेव्हा महाराज तिथे पोहोचले तेव्हा तेथील चौकीदाराने महाराजांना सांगितले की आता आतमध्ये तुम्हाला जागा नाही, रात्रही फार झाली आहे, पण माझा नाईलाज आहे. ठीक आहे असे म्हणून स्वामीमहाराज धर्मशाळेच्या बाहेरच्या बाजूला असलेल्या कोनाड्यात बसले. रात्रभर सूर्यभेदी प्राणायाम करून त्यांनी थंडीचे निवारण केले. काळोखी रात्र, चहूकडे बर्फ आणि स्वामींच्या अंगावर असलेले कमी वस्त्र यामुळे लोकांना वाटले की थंडीत स्वामींचे प्राण राहणार नाहीत, परंतु आतले लोक जेव्हा बाहेर आले तेव्हा त्यांनी बघितले की स्वामी महाराज आनंदाने बसले असून त्यांच्या शरीरावर घाम आलेला आहे. स्वामीमहाराज योगी होते. आतील अग्नितत्त्व जागृत करून स्वामीमहाराज बर्फाच्या थंडीत आनंदात राहू शकले.
पूर्वीच्या स्त्रिया सकाळी प्रथम चुलीला नमस्कार करून अग्नीची आराधना करत आणि नंतरच स्वयंपाकाला सुरुवात करीत असत. कलियुगात प्राण अन्नात आहे. अन्न अग्नीच्या उपासनेने माणसाला प्राप्त होते. कृतज्ञताबुद्धीने रोज अग्नीची उपासना करावी व अग्नी या गुरूची शिकवण आचरणात आणावी.
-स्नेहा शिनखेडे








