ऑनलाईन टीम / तरुण भारत :
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणकर्त्यांवर पोलिसांनी लाठीहल्ला केला. या घटनेचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. जालन्यात लोकांनी रास्तारोको आंदोलन करत तुफान दगडफेक केली. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार केला. तसेच अश्रूधुराच्या नळकांडय़ा फोडल्या.
जालना शहरातील अंबड चौफुली येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मराठा बांधव मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. हा जमाव अनियंत्रित होऊन त्यांनी खासगी वाहनांची जाळपोळ सुरू केली. संतप्त आंदोलकांनी जालन्यातील अंबड चौफुली परिसरात ट्रक पेटवला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून हवेत गोळीबार करण्यात आला.
लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ बीड जिल्ह्यातही कडकडीत बंद पाळण्यात आला. परळीत मराठा बांधव आक्रमक झाले होते. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा बांधवांनी आंदोलन केले. मराठा समाजाला आरक्षण द्या, अशी मागणी यावेळी करण्यात आली.








