वार्ताहर / कुडाळ
जालना जिल्ह्यातील अंबड गावात मराठा समाजाच्या वतीने आपल्या न्याय हक्कासाठी उपोषण चालू होते.या उपोषणस्थळी पोलिसांनी अमानुषपणे लाठीचार्ज करून मराठी समाजाच्या आंदोलकांना जखमी करून, आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. आपल्या न्याय हक्कासाठी उपोषणकर्त्या मराठा समाज आंदोलकांवर अमानुषपने लाठीचार्ज केला. त्याच्या विरोधात शिंदे – फडणवीस- पवार महायुती सरकारच्या निषेधार्थ आज कुडाळ शहरात गांधी चौक येथे राष्ट्रीय कॉग्रेसच्या वतीने काळे झेंडे दाखवून आंदोलन छेडण्यात आले.
यावेळी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यानी “शिंदे फडणवीस सरकारचा निषेध असो “, “मराठा समाजावर अन्यायकारक लाठी हल्ला करणाऱ्या सरकारचा निषेध असो”, ” या शिंदे फडणवीस सरकारच करायच काय, खाली डोकं वर पाय” अशा घोषणा दिल्या.कुडाळ काँग्रेस तालुका अध्यक्ष अभय शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले.
यावेळी कॉग्रेस जिल्हा उपाध्यक्ष विजय प्रभू, माजी नगराध्यक्षा आफरीन करोल, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, अल्प संख्याक तालुका अध्यक्ष तबरेज शेख, मंदार शिरसाट, उल्लास शिरसाट, तोसिफ शेख, रोहन काणेकर, वैभव आजगावकर, सुदंर सावंत, अनंत खटावकर आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.









