सरकारचे शेतकरी विरोधी धोरण : पत्रकार परिषदेत इराण्णा कडाडी यांचा इशारा
प्रतिनिधी/ बेळगाव
राज्य सरकारने रयत विरोधी कायदे तातडीने रद्द करावेत, अन्यथा येत्या 8 सप्टेंबर रोजी आंदोलन छेडण्याचा इशारा राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिला आहे.
पावसाअभावी शेतकऱ्यांच्या पिकांना धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत सरकारकडून सुरळीत वीजपुरवठा होईनासा झाला आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. त्याबरोबर शेतकऱ्यांसाठी राबविण्यात आलेल्या किसान सन्मान योजना, रयत विद्यानिधी योजना, गोशाळा योजना, एपीएमसी कायदा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणीत आणले जात आहे. त्यामुळे राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. राज्य सरकारच्या कालावधीत सुमारे 42 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. रयतांसाठी असलेल्या महत्त्वाच्या योजना बंद करून सरकार शेतकरी विरोधी धोरण अवलंबू लागले आहेत. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी येत्या 8 तारखेला आंदोलन छेडण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. यावेळी माजी आमदार अनिल बेनके, माजी आमदार संजय पाटील, शरद पाटील यासह शेतकरी उपस्थित होते.









