पुणे / प्रतिनिधी :
जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर काल पोलिसांनी लाठीचार्ज केल्याच्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर राज्य सरकारच्या निषेधार्थ शनिवारी आंदोलन करण्यात आले.
यावेळी राजेंद्र कुंजीर म्हणाले, राज्यभरात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शांततेच्या मार्गाने लाखोंच्या संख्येचे 53 मोर्चे काढण्यात आले होते. या मोर्चांची दखल जगाने घेतली. पण आपल्या येथील राज्यकर्त्यांनी जालना जिल्ह्यातल्या अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी अमानुषपणे लाठीचार्ज केला. या घटनेचा आम्ही निषेध व्यक्त करीत आहोत. तसेच सध्याच्या राज्य सरकार मधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तमाम मराठा समाजाची माफी मागावी आणि संबधित पोलीस अधिकाऱ्यांवर करावी, अशी आमची मागणी आहे. अन्यथा आम्ही अधिक तीव्र आंदोलन करू, असा इशाराही यावेळी त्यांनी राज्य सरकारला दिला.








