खानापूर नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांचा उद्धटपणा : कर्मचाऱ्यांना अर्वाच्च शिवीगाळ करत खुर्ची फेकून मारण्याचा प्रकार : सफाई कामगारांचे बेमुदत धरणे
खानापूर : नगरपंचायतीचे मुख्याधिकारी राजू वठारे यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून नगरपंचायतीच्या सफाई कर्मचाऱ्यांनी गुऊवारी आपल्या थकीत चार महिन्यांच्या वेतनासाठी नगरपंचायतीसमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. यावेळी मुख्याधिकारी राजू वठारे यांनी कर्मचाऱ्यांना अर्वाच्च शिवीगाळ करत खुर्ची फेकून मारण्याचा प्रकार घडला. यामुळे सफाई कर्मचाऱ्यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. या सफाई कर्मचाऱ्यांचे गेल्या चार महिन्यांपासूनचे वेतन देण्यात आले नाही. याबाबत त्यांनी मुख्याधिकारी वठारे यांना गणपती सणासाठी किमान दोन महिन्यांचे वेतन देण्याची विनंती केली. यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी टाळाटाळ करून त्यांना पिटाळून लावले. चार दिवस सफाई कर्मचाऱ्यांनी वारंवार विनंत्या करूनदेखील मुख्याधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष पेले. त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांनी गुरुवारी नगरपंचायतीचे प्रशासक तहसीलदार प्रकाश गायकवाड यांना भेटून लेखी निवेदन देऊन वेतन देण्याची विनंती केली. यावेळी तहसीलदारांनी मुख्याधिकाऱ्यांकडून दूरध्वनीवरून याबाबतची संपूर्ण माहिती घेतली आणि वेतन देण्याच्या सूचना केल्या. यानंतर कर्मचारी नगरपंचायतीकडे आले असता मुख्याधिकारी वठारे यांनी सर्व कर्मचाऱ्यांना अर्वाच्च शिवीगाळ करत धक्काबुक्की करून खुर्ची फेकून मारण्याचा प्रकार घडला. तसेच तुमचा पगार तहसीलदारांकडूनच घ्या, जर पगार पाहिजे असेल तर गावात फिरून वसुली करा, असे म्हणत शिवीगाळ करण्यास सुऊवात केली. यावेळी तेथे उपस्थित असलेले नगरसेवक रफिक वारीमणी व प्रकाश बैलूरकर यांनी मध्यस्थी करून वाद मिटविला. यानंतर कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलनास सुऊवात केली. तसेच थकीत वेतन व गेल्या वर्षभराचा पीएफ जोपर्यंत खात्यावर जमा होत नाही, तोपर्यंत धरणे आंदोलन सुरूच राहील, असा इशारा सफाई कामगार संघटनेचे अध्यक्ष शहानूर गुडलार यांनी देत आंदोलनाला सुऊवात केली. यानंतर मुख्याधिकारी राजू वठारे हे तेथून काढता पाय घेत बेळगावला बैठकीसाठी गेले.
नगरपंचायत प्रशासन व्यवस्था कोलमडली
मुख्याधिकारी वठारे हे ज्या दिवसापासून नगरपंचायतीचे मुख्याधिकारी म्हणून रुजू झाले आहेत. तेव्हापासून कायमच आडमुठे धोरण अवलंबत आहेत. वेळोवेळी नगरसेवकांवर वादावादीचे प्रसंग तसेच मनमानीमुळे नगरपंचायतीची प्रशासन व्यवस्था कोलमडली असून कर्मचारी आणि मुख्याधिकारी यांच्यात कोणताच ताळमेळ नसल्याने सामान्य नागरिकांना आपल्या कामासाठी नगरपंचायतीला खेटे मारावे लागत आहेत. तसेच साध्या कामासाठीही नागरिकांची आर्थिक पिळवणूक होत आहे. त्यामुळे सामान्य जनताही मुख्याधिकाऱ्यांच्या कारभारामुळे त्रस्त झाली आहे. विविध कारणास्तव कर्मचाऱ्यांना वेठीला धरून त्यांचीही आर्थिक पिळवणूक करण्यात येत असल्याचे यावेळी नगरसेवकांनी सांगितले. तसेच वठारे यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर थोड्याच कालावधीत प्रशासक नेमल्यामुळे नगरसेवकही हतबल झाले आहेत. अनेकवेळा वादाचे प्रसंग निर्माण झाले आहेत. त्यावेळी नगरसेवकांनी हस्तक्षेप करून वाद मिटविण्याचा प्रयत्न केला.
तोडगा काढण्यास असमर्थता
गेल्या मार्चपासून खानापूर शहरात घरफाळा, पाणीपट्टी यासह इतर करापोटी दीड कोटीच्यावर कर वसूल करण्यात आला आहे. याबाबत नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांना विचारले असता कोणताच खर्च सांगण्याचे टाळत त्यांनी नगरपंचायतीकडे वेतनासाठी निधी नसल्याचे सांगत याबाबत तोडगा काढण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत आंदोलन सुरू होते. सायंकाळी या धरणे आंदोलनाची माहिती मिळताच नगरसेवक अप्पय्या कोडोळी, मेघा कुंदरगी, नारायण ओगले, गुंडू तोपिनकट्टी, पंडित ओगले, अमृत पाटील, मेघा देसाई, हणमंत पाटील यासह इतर नगरसेवकांनी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले.









