रत्नागिरी / प्रतिनिधी :
गेल्या सात वर्षांपासून कोकणातील आंबा, काजू व्यावसायिकांना संपूर्ण कर्जमुक्तीची पतिक्षा राहिलीय. विविध समस्यांसाठी गेली सात वर्ष सातत्याने सरकार दप्तरी खेटे मारुनही पदरी सपशेल निराशा पडलीय. राज्यकर्त्यांना राज्यातील इतर पिके दिसतात, पण त्यांना कोकणातील आंबा मात्र दिसत नाही. आता एकत्र आला आहात, तर फक्त निवेदने देवून काहिही होणार नाही. कोकण कृषीविद्यापिठासह बॅकांवर धडकावे लागेल. तर वेळपडली तर मंत्र्यांनाही घेराव घालण्याचा गर्भित इशारा बागायतदार शेतकऱ्यांनी दिला आहे.
शासनाच्या उदासीन धोरणामुळे हतबल झालेल्या जिल्ह्यातील आंबा, काजू बागायतदारांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विकेते सह.संस्था, रत्नागिरी जिल्हा हापूस आंबा सह. संस्था, मंगलमुर्ती आंबा उत्पादक सह. संस्था, आडीवरे, पावस परिसर आंबा सह. संस्था, पावस विभाग, ओबीसी संघर्ष समन्वय समिती, रत्नागिरी, बहुजन विकास आघाडी यांच्या नेतृत्वाखाली भर पावसात बागायतदारांनी हे आंदोलन करून शासन, पशासनाचे लक्ष वेधून घेतले. यावेळी कर्जमुक्तीसाठी राज्य शासनाच्या दिरंगाईचा निषेध व्यक्त करण्यात आला. जिल्हाभरातून या आंदोलनासाठी बागायतदार शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते. जर वेळीच बागायतदारांच्या मागण्यांचा विचार केला नाही तर लढा तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. शासनाने 1200 कोटी दिल्यास आंबा बागायतदारांचे सर्व प्रश्न धसास लागू शकतात. परंतु आंबा बागायतदारांचे प्रश्न कुणीही गांभिर्याने घेत नसल्याची खंत बागायतदार संघटनेचे नेते तथा उपाध्यक्ष बावा साळवी यांनी यावेळी व्यक्त केली. बागायतदारांच्या शिष्टमंडळाने मागण्यांबाबत जिल्हाधिकारी एम. देवेंदसिंह यांची भेट घेत या बाबत चर्चा केली व निवेदन सादर केले. यावेळी कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विकेते सह. संस्थेचे अध्यक्ष पदीप सावंत, उपाध्यक्ष प्रकाश साळवी, राष्ट्रवादीचे नेते कुमार शेट्ये, नंदकुमार मोहिते, सुरेश भायजे, सचिन आचरेकर, विकास सावंत, मंगेश साळवी, मन्सूर काझी, अमृत पोकळे, किरण तोडणकर, अशोक भाटकर, प्रल्हाद शेट्ये, ज्ञानेश पोतकर, किसन घाणेकर, किरण तोडणकर यांच्यासह मोठ्या संख्येने आंबा बागायतदार या आंदोलनासाठी उपस्थित होते.
यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या महिला संघटक साक्षी रावणंग यांनी आंबा बागायतदारांना पाठिंबा देताना शासन फक्त शिवरायांचे नाव घेते पण त्यांच्या आदर्शाप्रमाणे रयतेची काळजी घेत नसल्याची खंत रावणंग यांनी यावेळी व्यक्त केली. सरकारला आंबा हे पिक दिसत नसल्याने आपल्याला वेळ पडली तर आंबा संशोधनासाठी विद्यापीठावर देखील मोर्चा काढावा लागेल, असे जि.प. माजी सदस्य उदय बने यांनी सांगितले. येथील प्रश्न सोडवण्यासाठी एक मंत्री परिषद येथे झाली पाहिजे.तरच कोकणातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय मिळेल. त्यासाठी आंदोलनाला सज्ज व्हा, असेही बने यांनी सांगितले. भाजपाचे नूतन जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी भेट देत बागायतदारांचे प्रश्न समजून घेतले. आपण याबाबत बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी बोलून यातून लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
बागायतदारांच्या मागण्या :
आंबा, काजूच्या छोट्यामोठ्या उत्पादकांची संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे, शेतकऱ्यांचे सातबारा उतारे कर्जमुक्त झाले पाहिजेत. फळबागायतदारांच्या विम्याचे निकष बदलले पाहिजेत. आंबा बागायतदारांना कृषीपंपानुसार बिल आले पाहिजे अशी भूमिका बागायतदारांनी व्यक्त केली. आंब्यावर पडणारे रोग याचा अभ्यास करण्यासाठी कृषी विद्यापिठाचे केंद्र रत्नागिरीत व्हावे. आंबा बागायतदार, शेतकरी, त्यांचे कुटुंबीय, त्यांच्या सोबतीने काम करणारे कामगार महिला व पुरुष यांना जीवन व आरोग्य विमा संरक्षण मिळावे. तसेच शेतांमध्ये बागांमध्ये काम करत असताना सर्पदंश, जंगली श्वापदे, झाडावरुन पडणे, फवारणी करताना विषबाधा, हृदयविकार इ. मुळे मृत्यू आल्यास त्यांनाही विमा संरक्षण देण्यात यावे.









