विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी जि. पं. अधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : ग्राम पंचायतीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी कर्नाटक राज्य ग्राम पंचायत नोकर संघातर्फे मोर्चा काढून जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांना निवेदन देण्यात आले. ग्राम पंचायतींमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना किमान वेतन देण्यात यावे, असा आदेश उच्च न्यायालयाने जारी केला आहे. मात्र न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी केली जात नाही. याबाबत ग्रामीण विकास मंत्री यांच्याबराब्sार चर्चा करण्यात आली आहे. मात्र निर्णय घेण्यात आलेला नाही. सदर कर्मचाऱ्यांना तातडीने किमान वेतन 31 हजार रुपये द्यावे यासाठी आदेश जारी करण्यात यावा, अशी मागणी संघातर्फे करण्यात आली आहे.
ग्राम पंचायतीमध्ये महसूल वसुली, सफाई कर्मचारी, डाटा एन्ट्री ऑपरेटर, जवान, वॉटरमॅन आदी कर्मचारी सेवा बजावत आहेत. वेतन वगळता इतर कोणत्याच सुविधा दिल्या जात नाहीत. सेवा बजावून निवृत्ती झाल्यानंतर त्यांच्या उतारवयात कोणत्याच सुविधा नसल्याने मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असते. त्यासाठी त्यांना पेन्शन सुविधा देण्यात यावी, अशी मागणी संघातर्फे करण्यात आली. सेवा ज्येष्ठतेच्या आधारावर वेतनवाढ, आरोग्य विमा, आयपीडी सुविधा व इतर सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच वाढती महागाई नियंत्रणात आणावी. शेतकरीविरोधी कायदे मागे घेण्यात यावेत, आरोग्य योजनांचा लाभ करून देण्यात यावा, कंत्राटी पद्धतीवरील कर्मचारी नेमणूक प्रक्रिया रद्द करावी, अशा विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.









