लवकरच बेंगळूरला देणार धडक
बेळगाव : नवीन पेन्शन स्कीम (एनपीएस) रद्द करून सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन स्कीम लागू करावी यासाठी बेंगळूर येथे भव्य आंदोलन केले जाणार आहे. नव्या पेन्शन स्कीममुळे कर्मचाऱ्यांचे हाल होणार असून राज्य सरकारने हा धोका ओळखून राज्यातील सर्व विभागांमधील सरकारी कर्मचाऱ्यांना जुनीच पेन्शन स्कीम लागू करावी, अशी मागणी कर्नाटक राज्य सरकारी एनपीएस नोकर संघाचे राज्य अध्यक्ष शांताराम यांनी केली. रविवारी कुमार गंधर्व रंगमंदिर येथे बेळगाव जिल्ह्यातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीदरम्यान एनपीएसबाबत सखोल चर्चा करण्यात आली. व्यासपीठावर प्राथमिक शाळा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष जयकुमार हेब्बळ्ळी, माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष रामू गुगवाड, माजी अध्यक्ष जगदीश पाटील यांच्यासह इतर उपस्थित होते. यावेळी बोलताना जगदीश पाटील यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. जुनी पेन्शन स्कीम कर्मचाऱ्यांना लागू करण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. आता सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे लढा देण्याची गरज आहे. बेंगळूर येथे होणाऱ्या आंदोलनावेळी राज्यभरातील सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन जुनी पेन्शन स्कीम सुरू करून घ्यावी, असे त्यांनी सांगितले. या बैठकीला बेळगाव जिल्ह्यातील शिक्षण, महसूल, आरोग्य, हेस्कॉम, सुवर्ण विधानसौध कर्मचारी यासह विविध विभागातील कर्मचारी सहभागी झाले होते.









