शेतकऱयांकडून भाजीपाल्याचीही विक्री : बेकायदेशीर भाजीमार्केटची परवानगी रद्द करण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
शेतकऱयांच्या मालाला किमान दर द्यावा, बेकायदेशीर भाजीमार्केटची परवानगी रद्द करावी, ते भाजी मार्केट बंद करावे, यासह इतर मागण्यांसाठी शेतकऱयांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात आठवडाभर विविध ठिकाणी शेतकरी आंदोलन करीत आहेत. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत त्याच ठिकाणी भाजीविक्री केली. भाजी खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दीही केली होती.
केंद्र सरकारने अमलात आणलेले शेतकऱयांच्या विरोधातील तीन जाचक कायदे रद्द केले. ही बाब अत्यंत स्वागतार्ह आहे. मात्र, शेतकऱयांनी उत्पादित केलेल्या मालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी अजूनही अडचणीत आहेत. शेतकऱयांच्या मालाला किमान भाव मिळावा यासाठी कायदा असून त्या कायद्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
यापूर्वी शेतकऱयांनी जिल्हा पंचायत तसेच विविध लोकप्रतिनिधींच्या कार्यालयासमोर आंदोलने छेडली आहेत. त्यानंतर आता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून साऱयांचेच लक्ष वेधले आहे. सोमवारी भाजीपाला समोर ठेवून केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. बेळगावात एपीएमसी मार्केट असताना खासगी मार्केटला परवानगी देऊन जिल्हा प्रशासनाने एपीएमसीबरोबरच शेतकऱयांचे मोठे नुकसान केले आहे. खासगी भाजी मार्केटवर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली.
यावेळी सिद्दगौडा मोदगी, शिवलीला मिसाळे यांच्यासह शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. या आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱयांची भेट घेऊन शेतकऱयांनी कैफियत मांडली.









