भाजपची निदर्शने, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : लोकसभा निवडणुकीत धडा शिकविण्याचा इशारा
बेळगाव : राज्यातील काँग्रेस सरकार हिंदूविरोधी भूमिका घेत आहे. मंड्या जिल्ह्यामध्ये एका गावातील नागरिकांनी उभारलेल्या खांबावरील भगवा ध्वज सरकारने पोलीस बळाचा वापर करून तो उतरविला आहे. यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. राज्य सरकारने हिंदूविरोधी धोरण त्वरित थांबवावे अन्यथा राज्यभरात तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा भाजपतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. तत्पूर्वी भाजपच्या महानगर व ग्रामीण कार्यकर्त्यांतर्फे चन्नम्मा चौकामध्ये आंदोलन करून राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. खासदार इराण्णा कडाडी, खासदार मंगला अंगडी, माजी आमदार संजय पाटील, माजी आमदार अनिल बेनके यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मंड्या जिल्ह्यामध्ये करगोडू गावामध्ये दि. 22 जानेवारी रोजी राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांकडून 108 फूट उंचीचा ध्वजस्तंभ उभारला होता. त्यावर हनुमानाचा ध्वज फडकावला होता. राज्य सरकारला ही ग्रामस्थांची भूमिका खुपली आहे. हिंदूविरोधी भूमिका घेणाऱ्या राज्य सरकारने अल्पसंख्याकांच्या मतांसाठी ध्वज उतरविला आहे. पोलीस बळाचा वापर करून ध्वज उतरविण्यास भाग पाडला आहे. याविरोधात विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी आंदोलन छेडले होते. त्यांनाही अटक करून सोडण्यात आले आहे.
राज्य सरकारची भूमिका चुकीची
राज्य सरकारने घेतलेली भूमिका अत्यंत चुकीची आहे. असे प्रकार राज्यामध्ये वारंवार घडत आहेत. अल्पसंख्याकांची मते मिळविण्यासाठी काँग्रेस सरकार हिंदूंना डिवचण्याचा प्रयत्न करत आहे. हे कदापिही खपवून घेतले जाणार आहे. यापुढे सरकारने अशीच भूमिका ठेवल्यास राज्यभरात तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा भाजप नेत्यांनी दिला आहे. हुबळी व इतर ठिकाणीही भगवा ध्वज उतरविण्याचे प्रकार घडले आहेत. अशा घटना त्वरित रोखण्यात याव्यात. ध्वज उतरविण्यात आलेल्या ठिकाणी पुन्हा ध्वज फडकविण्यात यावा अन्यथा राज्यभरात आंदोलन करून सरकारला येत्या लोकसभा निवडणुकीत योग्य धडा शिकविण्यात येईल, असे सांगण्यात आले.









