नाश्ता घेण्यास दिला नकार : अधिकाऱ्यांनी काढली समजूत
बेळगाव : हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनी रविवारी सकाळी निदर्शने केली आहेत. चित्रपट अभिनेता दर्शन तुगुदीपला बेंगळूर येथील परप्पन अग्रहर कारागृहात विशेष सुविधा पुरविल्यानंतर संपूर्ण राज्यातील कारागृहातील व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून, त्यामुळेच कैद्यांनी आपल्याला तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ उपलब्ध करून द्या, या मागणीसाठी निदर्शने केली आहेत. दर्शन व त्याच्या साथीदारांना राज्यातील वेगवेगळ्या कारागृहात हलवण्यात आले आहे. दर्शन प्रकरणानंतर कारागृह विभागाचे अधिकारीही पार हबकून गेले असून कैद्यांना ज्या काही सुविधा व सवलती मिळत होत्या, त्या अचानक बंद करण्यात आल्या आहेत. सरकार पातळीवर दर्शन प्रकरणाची चर्चा झाल्यामुळे कारागृहातील हालचालींवर नजर ठेवण्यात येत आहे. त्यामुळे बेंगळूर, बेळगावसह राज्यातील बहुतेक कारागृहात नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येत आहे.
चढ्या भावाने कैद्यांना तंबाखू उपलब्ध
तंबाखूचे व्यसन असणाऱ्या कैद्यांना कारागृहातही तंबाखू लागतो. त्यामुळे ते कसेबसे उपलब्ध करून देतात. कारागृहातील कँटीनमध्ये तंबाखू, गुटखा, विडी, सिगारेट उपलब्ध होत होते. चढ्या भावाने या तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केली जात होती. जास्त पैसे मोजून का असेना, कैद्यांना तंबाखू उपलब्ध होत होता. तंबाखू मिळाला नाही म्हणून कैद्याने स्वत:लाच जखमी केले. दर्शन प्रकरणानंतर कारागृहातील कँटीनमध्ये तंबाखूजन्य पदार्थांची विक्री बंद करण्यात आली आहे. तंबाखू मिळणे बंद झाल्यामुळे तंबाखूचे व्यसन असणाऱ्या कैद्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. तंबाखू मिळाला नाही म्हणून दोन दिवसांपूर्वी कारवार कारागृहात एका कैद्याने स्वत:लाच जखमी केल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच बेळगावात कैद्यांनी निदर्शने केली आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून समजूत
उपलब्ध माहितीनुसार नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी कैद्यांना अल्पोपहार वाटप सुरू झाला. त्यावेळी पुढे आलेल्या चौघा जणांनी कारागृहात तंबाखू, विडी, सिगारेट उपलब्ध करून द्यावे. नहून आम्ही नाश्ता करणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यावेळी कारागृहातील अधिकाऱ्यांनी त्यांची मनधरणी करूनही त्यांनी नाश्ता घेतला नाही. शेवटी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढल्यानंतर कैद्यांनी नाश्ता व जेवण घेतले.









