ऑनलाईन टीम / तरुण भारत :
महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमेवर दुर्लक्षित असलेल्या कासार-शिरशी येथे नवीन अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्यासाठी भाजप आ. अभिमन्यू पवार यांनी पुढाकार घेतला आहे. मात्र, कासार-शिरशी महसूल मंडळातील 68 गावांनी याला विरोध दर्शवत आ. पवार यांच्याविरोधात आंदोलन छेडले आहे. आज पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत त्यांचा पुतळा आक्रमक आंदोलकांनी जाळला.
लातूर जिल्ह्यातल्या निलंगा येथे तहसील कार्यालय आहे. या तहसील कार्यालयावरील ताण कमी करण्यासाठी कासार-शिरशी महसूल मंडळात 68 गावांसाठी नवे अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याचे अभिमन्यू पवार यांचे प्रयत्न सुरू आहेत. ग्रामस्थांची मागणी नसतानाही आ. पवार यांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी हे उपदव्याप चालवल्याचा आंदोलकांचा आरोप आहे. आ. पवार यांच्याविरोधात 68 गावांच्या ग्रामस्थांनी आंदोलन पुकारले आहे. आज आक्रमक आंदोलकांनी निलंगा पंचायत समितीसमोर पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून पुतळा जाळला.








