गुन्हेगारी कारवाया रोखण्यासाठी उद्यमबाग पोलिसांना निवेदन
बेळगाव : उद्यमबाग औद्योगिक वसाहतीत बँक ऑफ बडोदाच्या इमारतीच्या पाठीमागील बाजूची भिंत फोडून दरोड्याचा प्रयत्न झाल्यानंतर कारखानदारांत भीतीचे वातावरण पसरले आहे. गुन्हेगारांच्या टोळीत चार महिलांचाही समावेश असून औद्योगिक वसाहतीत या महिलांची चांगलीच दहशत आहे. या दहशतीविरुद्ध सोमवारी सर्व कारखानदार एकवटले होते. गेल्या दोन-तीन महिन्यांत उद्यमबाग परिसरात घडलेल्या चोऱ्यांचे प्रकार लक्षात घेता व सीसीटीव्ही फुटेज पडताळून पाहिले असता अधिकाधिक प्रकरणात चार महिलांचा सहभाग आढळून येतो. कारखानदारांनी याविषयी सोमवारी पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी परिसरात पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी करीत उद्यमबाग पोलीस स्थानकावर कारखानदारांनी आपला मोर्चा वळविला. उद्यमबागचे पोलीस निरीक्षक डी. के. पाटील यांची भेट घेऊन त्यांनी आपल्या समस्या मांडल्या. चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष सी. सी. होंडदकट्टी, लघुउद्योग भारतीचे सचिन सबनीस, चेंबरचे माजी अध्यक्ष रोहन जुवळी, स्मॉल स्केल इंडस्ट्रीजचे श्रीधर उप्पीन, एमएसएमईचे महादेव चौगुले, शाम माली, बेलगाम मायक्रो इंडस्ट्रीयल असोसिएशनचे रमेश देसूरकर, राजू वर्पे, विनायक देसाई आदींसह 50 हून अधिक कारखानदारांचा यामध्ये समावेश होता.
सोमवारी सकाळी उद्यमबाग परिसरात एकत्र येऊन वाढत्या चोऱ्या रोखण्यासाठी पोलिसांना गळ घालण्याचे ठरविण्यात आले. त्यानंतर उद्यमबाग पोलीस स्थानकात जाऊन पोलीस निरीक्षकांबरोबर चर्चा करण्यात आली. बहुतेक कारखानदारांनी औद्योगिक वसाहतीत दहशत माजविणाऱ्या चार महिलांच्या मुसक्या आवळा, अशी मागणी केली. यापूर्वी अनेकवेळा त्या महिलांची धरपकड झाली आहे. मात्र, उघडपणे हातात शस्त्रs घेऊन या महिला औद्योगिक वसाहतीत फिरतात. त्यांना हटकण्याचा प्रयत्न करणाऱ्या कारखानदारांना व कामगारांना धमकावतात. सीसीटीव्हीचे फुटेज देऊनही त्याचा उपयोग होत नाही. त्यामुळे चोऱ्या रोखण्यासाठी गस्त वाढविण्याची मागणी कारखानदारांनी केली. चोरीची एखादी घटना घडल्यानंतर पोलीस स्थानकात फिर्याद देण्यासाठी येणाऱ्यांना व्यवस्थित वागणूक मिळत नाही, अशी तक्रारही कारखानदारांनी केली. यावर पोलीस निरीक्षक डी. के. पाटील यांनी केवळ तीन महिन्यांपूर्वी आपण उद्यमबाग पोलीस स्थानकात रुजू झालो आहोत. वाढत्या चोऱ्या रोखण्यासाठी रात्रीची गस्त अधिक काटेकोर करण्यात आली आहे. ई-बिट बरोबरच नोंदवहीची पद्धतही अंमलात आणण्यात आली आहे. या परिसरात दहशत माजविणाऱ्या गुन्हेगारी टोळ्या व या टोळीतील महिलांना लवकरच अटक करू, असे त्यांनी सांगितले.
यापूर्वीच रखवालदार नियुक्तीची सूचना
बँक ऑफ बडोदाच्या इमारतीला ड्रिल ब्रेकरच्या साहाय्याने खिंडार पाडण्याचा प्रयत्न झाला आहे. या घटनेची पोलीस दलाने गांभीर्याने दखल घेतली आहे. उद्यमबाग पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात बारा बँका व चौदा एटीएम आहेत. 19 नोव्हेंबर 2023 रोजी पोलीस अधिकाऱ्यांनी या सर्व बँकांना पत्रे पाठवून बँका व एटीएमच्या सुरक्षिततेसाठी रखवालदार नेमण्याची सूचना केली होती. मात्र, एकाही संस्थेने या सूचनेचे पालन केले नाही. पोलिसांची गस्त असतेच. मात्र, बँकांनाही रखवालदार नियुक्त करावेत, अशी सूचना पोलीस अधिकाऱ्यांनी केली आहे.









