पणजी : पर्यटनाच्या गरजा आणि स्थानिक उपजीविकेचा समतोल साधण्यासाठी नियमन केलेली न्याय्य व्यवस्था असावी या उद्देशाने सरकारच्या विचाराधीन असलेला ट्रान्स्पोर्ट अॅग्रीगेटर प्रश्न सर्वांना विश्वासात घेऊन लवकरच सोडविण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे. बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. गोव्यातील टॅक्सी प्रश्न दीर्घकाळापासून प्रलंबित आहे. तो लवकरात लवकर सोडविण्यात येणार आहे. तत्पूर्वी सरकार सर्व भागधारकांना विश्वासात घेईल आणि सर्वांच्या हिताचा समावेश असलेल्या उपाय योजना आणण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
सरकारतर्फे येथील पारंपरिक टॅक्सीचालक आणि अॅग्रीगेटर सेवा या दोघांनाही सामावून घेणारा तोडगा काढण्यात येईल. त्यामुळे कोणत्याही घटकाचे नुकसान होणार नाही याची जबाबदारी सरकार घेईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था सक्षम आहे. गुन्हे घडल्यानंतर पोलिस तत्परतेने कारवाई करत असून गुन्हेगारांना पकडले जात आहेत. सध्या गाजणाऱ्या दोन मुलींवरील लैगिक अत्याचार घटनेतील गुन्हेगारांवरही तेवढ्याच त्वरेने कारवाई होईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. खरे तर असे गुन्हे घडतात तरी कसे, याचाही विचार होणे आवश्यक आहे आणि त्यादृष्टीने जागृती झाली पाहिजे, असे ते पुढे म्हणाले.








