पालकांची आर्थिक लूट, वशिल्याच्या नावाखाली खिसे गरम करण्याचा प्रकार
बेळगाव : अद्याप शालांत परीक्षांना प्रारंभ झाला नसला तरी पुढील वर्षाच्या प्रवेशासाठी पालकांची धावपळ सुरू आहे. इंग्रजी शाळांचे वाढते प्रस्थ लक्षात घेऊन काही एजंट शाळा प्रवेशासाठी पुढे सरसावले आहेत. नामांकित शाळांमध्ये प्रवेश मिळवून देतो, असे सांगून पालकांकडून भरमसाट पैसे उचलले जात आहेत. यामुळे पालकांची आर्थिक लूट होत असून, असे प्रकार वेळीच थांबविणे गरजेचे आहे. आपल्या पाल्यांना नामांकित इंग्रजी शाळांमध्ये दाखल करणे ही प्रतिष्ठेची बाब ठरत आहे. त्यामुळे पुढील वर्षाच्या प्रवेशासाठी 3 ते 4 महिने पूर्वीपासूनच तयारी करण्यात येत आहे. कितीही पैसे खर्च झाले तरी चालतील. परंतु चांगल्या शाळेतच प्रवेश मिळावा, यासाठी पालकांची धडपड सुरू असते. शाळेशी संबंधित व्यक्तींना वशिला लावून प्रवेश मिळतो का हे पाहिले जाते. याचाच फायदा एजंट उठवत आहेत.
ओळखीचा फायदा घेण्याचा प्रयत्न
शाळा प्रवेशासाठी आपल्या ओळखीचा फायदा घेत काहीजण प्रवेश मिळवून देतो म्हणून पालकांकडे पैशांची मागणी करतात. पहिल्या फेरीत प्रवेश मिळालाच तर तो आपल्यामुळे, दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळण्यासाठी अजून पैशांची मागणी, प्रवेश मिळालाच नाही तर त्या पालकाकडे फिरकायचेही नाही, अशी भूमिका या एजंटांची आहे.
पैसे परत मिळविण्यासाठी एजंटांच्या घरचे उंबरठे झिजविण्याची वेळ
आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी जमा केलेल्या पुंजीतील अधिकतर रक्कम ही एजंटांनाच द्यावी लागत आहे. पैसे देऊनही काम झाले नाही तर पैसे मिळविण्यासाठी एजंटाच्या घरचे उंबरठे झिजविण्याची वेळ पालकांवर येते. सध्या असे अनेक एजंट शाळा व्यवस्थापन मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या अवतीभवती शाळा परिसरात घुटमळत आहेत. सावज दिसताच त्यांच्याकडून पैसे वसूल करण्याचा प्रयत्न केला जात असून हे प्रकार वेळीच थांबविणे गरजेचे आहे.









