भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूर आणि कोव्हीड महामारीसारख्या काळात विशेष अधिवेशन बोलावले नाही. पण मुंबई महाराष्ट्र राज्यापासून वेगळे करून केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करणे हा संसदेच्या आगामी विशेष अधिवेशनाचा अजेंडा असल्याचा थेट आरोप महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर केला.
18 ते 22 सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या विशेष अधिवेशनाचा अजेंडा केंद्र सरकारने अजूनही स्पष्ट केलेला नाही. त्यामुळे विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारवरच्या या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीकडून ही सत्ताधारी पक्षावर टिका केली जात असून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.
माध्य़मांशी बोलताना ते म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड महामारी किंवा 2016 मध्ये केलेल्या नोटबंदी सारख्या मुद्द्यावर तसेच मणिपूरसारख्या ज्वलंत मुद्द्यांवर संसदेचे विशेष अधिवेशन कधीही बोलावले नाही. आता सरकारच्या मन:स्थितीनुसार अधिवेशन बोलावले आहे. हे अधिवेशन मुंबईला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करूनन महाराष्ट्रापासून वेगळे करण्यासाठीच बोलावले आहे.” असा आरोप पटोले यांनी केंद्र सरकारवर केला.
पुढे बोलताना ते म्हणाले, “मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आणि आर्थिक राजधानी आहे. मुंबईतील एअर इंडिया, इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर, हिऱ्यांचे मार्केट यासारख्या महत्वाच्या संस्था मुंबईबाहेर हलवली जात आहेत.” असा आरोपही नाना पटोले करताना बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज गुजरातमध्ये हलवण्याची योजना सुरू असल्याचा दावाही त्यांनी केला.
शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे मिळून झालेले महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार अशा महाराष्ट्र राज्यविरोधी निर्णयांमध्ये मोठा अडथळा ठरत असल्यानेच केंद्राने ते पाडले, असा आरोपही पटोले यांनी भाजपवर केला.