मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची घोषणा
वृत्तसंस्था/ रांची
झारखंड सरकारने वृद्धापकाळ निवृत्ती वेतनासाठी पात्रता वय 60 वरून 50 वर्षे केले आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी शुक्रवारी यासंबंधी महत्त्वपूर्ण घोषणा केली. या मुख्य निर्णयाबरोबरच सोरेन मंत्रिमंडळाने आणखीही काही बदल केले आहेत. त्यानुसार राज्यात कार्यालये स्थापन करणाऱ्या कंपन्यांमधील 75 टक्के नोकऱ्या स्थानिक लोकांसाठी राखीव असतील, असेही ते म्हणाले. झारखंड हे देशातील सर्वात गरीब राज्य असून ते कोविड-19 आणि दुष्काळाशी झुंज देत आहे. मात्र असे असतानाही राज्य सरकारमध्ये अनागोंदी कारभार दिसत नाही, असे सोरेन म्हणाले. कोरोना संसर्गाच्या काळात झारखंडसारख्या गरीब राज्याने इतर राज्यांना ऑक्सिजनचा पुरवठा केल्याचा दावा त्यांनी केला. तसेच कोरोना साथीच्या काळात गरीब मजूर वाचले. मात्र दोन मंत्र्यांना आपला जीव गमवावा लागला, असेही त्यांनी स्पष्ट केले.









