हेमंत सोरेन यांच्या वयावरून वाद : भाजपकडून झारखंडचे मुख्यमंत्री लक्ष्य
वृत्तसंस्था/ रांची
महाराष्ट्रासोबत झारखंडमध्येही विधानसभा निवडणूक होणार आहे. राजकीय पक्षांनी निवडणुकीत विजयी होण्यासाठी कंबर कसली आहे. याचदरम्यान झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या वयावरून एक नवा वाद उभा ठाकला आहे. सोरेन यांनी बरहेट मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला आहे. हेमंत यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांचे वय 5 वर्षांमध्येच 7 वर्षांनी वाढले आहे. अखेर 5 वर्षांमध्ये 7 वर्षांनी वय कसे वाढले असा प्रश्न आता भाजपने उपस्थित केला आहे. 2019 च्या निवडणुकीवेळी हेमंत सोरेन यांनी उमेदवारी अर्जात स्वत:चे वय 42 वर्षे नमूद केले होते. तर यंदा त्यांनी स्वत:चे वय 49 वर्षे असल्याचे म्हटले आहे.
हेमंत सोरेनच आता 2019 मध्ये नमूद वय योग्य होते का 2024 मध्ये नमूद केलेले वय योग्य आहे हे सांगू शकतील. 2024 मधील वय खरे असेल तर याचा अर्थ 2019 ची विधानसभा निवडणूक त्यांनी खोट्या प्रतिज्ञापत्राच्या आधारावर जिंकली होती असा होतो अशी टीका भाजपने केली आहे.
आसाम मुख्यमंत्र्यांनी साधला निशाणा
हेमंत सोरेन यांचा उमेदवारी अर्ज रद्द होऊ नये. जनताच त्यांना पराभूत करणार असल्याचे वक्तव्य आसामचे मुख्यमंत्री आणि झारखंड भाजपचे सह-प्रभारी हेमंत विश्व शर्मा यांनी केले आहे. हेमंत सोरेन यांनी केलेला हा प्रकार चुकीचा असल्याचे आम्ही निवडणूक आयोगाला कळविले आहे. किमान प्रतिज्ञापत्र तरी सोरेन यांनी योग्यप्रकारे सादर करावे असे भाजप प्रदेशाध्यक्ष बाबूलाल मरांडी यांनी म्हटले आहे. भ्रष्टाचाराचे नवे मापदंड प्रस्थापित करणारे झामुमोचे सरकार आता प्रतिज्ञापत्रांमध्येही भ्रष्टाचार करत आहे. हेमंत सोरेन हे मागील 5 वर्षांमध्ये 7 वर्षांनी मोठे झाले आहेत. अशाचप्रकारे त्यांनी भ्रष्टाचार आणि घोटाळे केले असल्याची टीका भाजप नेते शहजाद पूनावाला यांनी केली आहे.
झामुमोकडून सारवासारव
सोरेन यांच्या झामुमो पक्षाचे नेते मनोज पांडे यांनी याप्रकरणी सारवासारव केली आहे. आमचा पक्ष काहीच लपवत नाही. सर्व दस्तऐवज सादर केले आहेत. भाजप केवळ पराभवाच्या शक्यतेमुळे कट रचत आहे. आम्ही खोटारडे नाही, भाजपचे अनेक नेते प्रतिज्ञापत्रात बनावट पदवीचा उल्लेख करतात असे पांडे यांनी म्हटले आहे. हेमंत सोरेन हे झामुमोचे नेते असून बरहेट मतदारसंघातून त्यांनी अर्ज भरला आहे. राज्यात सध्या झामुमोचे सरकार असून काँग्रेसही यात सामील आहे.









