प्रवास हा अनेकांचा सर्वपरिचित छंद आहे. जवळपास प्रत्येकजण केव्हाना केव्हा कुठे ना कुठे प्रवास करुन आलेलाच असतो. काहीजण तर पायाला भिंगरी बसविल्यासारखे नेहमीच प्रवासात असतात. पण ब्रिटनचे नागरीक बेक्स लुईस आणि बिल मोंटेगोमेरी यांचा अवघा 11 महिन्यांचा पुत्र ‘अॅटलास’ हा जगातील सर्वात छोट्या वयाचा प्रवासी ठरला आहे. त्याने त्याच्या आतापर्यंतच्या 11 महिन्यांच्या आयुष्यात तब्बल 23 देशांचा प्रवास केला आहे.

सर्वसाधारणत: मुले अगदी लहान वयाची असताना त्यांना प्रवासाला नेण्यात येत नाही. प्रवासात त्यांना काही शारीरीक समस्या जाणवल्या तर त्यांच्यावर उपचार उपलब्ध असतीलच असे नाही. त्यामुळे शक्यता नेणत्या वयाचा मुलांना ती मोठी होईपर्यंत दूरच्या प्रवासाला नेले जात नाही. पण मोंटेगोमेरी दांपत्याचा विचार अलग आहे. या दांपत्याला प्रवासाची आवड नव्हे, तर व्यसनच आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलाचे नावही प्रवासाला साजेसे असे ‘अॅटलास’ (नकाशा पुस्तिका) असे ठेवले. त्याचा जन्म होऊन अवघे सहा आठवडे झाले असतानाच त्यांनी त्याला प्रथम विदेशवारी घडविली. त्याचा पहिला दात उगवला तेव्हा तो नॉर्वेत होता. तर त्याने प्रथम घट्ट अन्नपदार्थ खाण्यास प्रारंभ केला तेव्हा तो फ्रान्समध्ये होता.
या दांपत्याने त्यांचा बहुतेक प्रवास स्वत:च्या व्हॅनने केला असून पश्चिम युरोपातील जवळपास सर्व देश पालथे घातले आहेत. या प्रत्येक प्रवासात त्यांच्यासह नुकताच जन्मलेला अॅटलास होता. काही देश त्यांनी त्याच्या जन्मापूर्वी पाहिले होते. पण ते देश त्यांनी मुलासाठी म्हणून आणखी एकदा पाहिले. वास्तविक हे पतीपत्नी श्रीमंत आहेत, असे म्हणता येणार नाही. प्रवासाला प्रारंभ करण्याआधी ते काटकसर करुन बराच पैसा जमा करुन ठेवतात आणि नंतर तो प्रवासासाठी खर्च करतात. प्रवासातही ते पैशाची उधळपट्टी करु शकत नाहीत. ते प्रतिदिन केवळ चार डॉलर्स अन्नपाण्यावर खर्च करतात. प्रवासातही त्यांची राहणी अगदी साधी असते. केवळ एक ‘पॅशन’ म्हणून ते प्रवास करतात असे त्यांचे सहकारी म्हणतात.









