वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
‘बीसीसीआय’च्या वरिष्ठ निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर अहमदाबाद येथे 5 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकासाठीच्या आराखड्यांवर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्याशी चर्चा करण्यासाठी वेस्ट इंडिजला जाणार आहेत.
भारत 8 ऑक्टोबर रोजी चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलियाशी खेळणार आहे, तर 15 ऑक्टोबरला अहमदाबादमध्ये पाकिस्तानविऊद्धचा त्यांचा महत्त्वाचा सामना होणार आहे. सध्या सलील अंकोला वेस्ट इंडिजमध्ये आहे. पण कसोटी मालिका संपल्यानंतर तो परत येईल. एकदिवसीय सामने सुरू होण्यापूर्वी आगरकर संघाला येऊन भेटतील, असे बीसीसीआयच्या एका सूत्राने नाव न उघड करण्याच्या अटीवर बोलताना सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, निवड समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर आगरकर यांना संघ व्यवस्थापनाला प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळालेली नाही आणि विश्वचषकासाठी भारताची रणनीती काय असावी याचा विस्तृत आराखडा तयार करण्याची संधी त्यांना या भेटीतून मिळेल. संघ व्यवस्थापन आणि निवड समिती यांच्यात तंदुऊस्तीच्या समस्या आणि खेळाचा ताण हे विषय हाताळण्याव्यतिरिक्त विश्वचषकाच्या आधी मुख्य 20 खेळाडू निवडण्याच्या बाबतीत समन्वय राहणे गरजेचे आहे.
निवड समितीचे अध्यक्ष तसेच संघ व्यवस्थापन प्रमुख यावेळी संक्रमणाच्या योजनेवर चर्चा करतील. जसप्रीत बुमराहच्या तंदुऊस्तीची स्थिती आणि तीन सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी तो आयर्लंडला जाऊ शकेल की नाही यावरही यावेळी सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती मिळाली आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या क्रीडाशास्त्र आणि वैद्यकीय विभागाने बुमराहला खेळण्यासाठी तंदुरुस्त असल्याचा दाखला अजून जारी केलेला नाही.
दरम्यान, व्ही. व्ही. एस लक्ष्मण पुन्हा एकदा दुय्यम संघ आयर्लंडला घेऊन जाईल. लहान दौऱ्यांसाठी ही पद्धत अवलंबली जाताना हल्लीच्या काळात दिसून आलेले आहे. वेस्ट इंडिज आणि आयर्लंड दौऱ्यांमधील अंतर कमी असल्याने द्रविडला विश्रांती देण्यात येणार आहे.