पणजी : राज्यातील विविध वैशिष्ट्यापूर्ण आणि अद्वितीय अशा वस्तुंना आतापर्यंत जीआय मानांकन प्राप्त झाले असून त्या मालिकेत आता आणखीही काही वस्तुंना स्थान मिळणार आहे. त्यात पारंपारिक मिठागरांमधून काढण्यात येणारे अर्थात ‘आगराचें मिठ’, देवघरातील अखंड तेवणारा तसेच विवाह, उत्सवांमध्ये वापरला जाणारा तांबे आणि पितळीपासून हस्तनिर्मित लोंबता दिवा अर्थात ‘लामणदिवा’, आणि विवाह सोहळ्यावेळी नववधू स्वहस्ते विणलेल्या विविध सुती वस्तु, ज्या भेटवस्तू म्हणून तिच्या सासरी नेतात त्या ‘क्रोशे’ कलाकृती यांचा समावेश आहे. गोव्यात विवाह सोहळ्यात नववधूने क्रोशे कलाकृती तिच्या सासरी नेणे ही पिढ्यानपिढ्यांची परंपरा आहे. या क्रोशेमध्ये फ्रोंजी एम्ब्रॉयडरी (उशी कव्हर), लोकरी सूत आणि विशिष्ट हुक असलेल्या सुईच्या आधारे इंटरलॉक (विणकाम) करून तयार केलेले वैशिष्ट्यापूर्ण कलाकृती, स्वेटर, कानटोपी, आदींचा समावेश असतो.
या सर्व वस्तू जास्त करून विवाहाच्या दुसऱ्या दिवशी नववधूकडून नातेवाईकांना दाखविण्यात येतात. त्यासाठी घरातच छोटेखानी प्रदर्शन मांडण्यात येते. त्यानंतर त्यातील काही वस्तू प्रेमाचे प्रतीक म्हणून त्या उपस्थितांना भेट देण्यात येतात. त्यात जास्त करून उशी कव्हरसारख्या वस्तूंचा समावेश असतो. ही परंपरा विशेषत: गोव्यातच आहे.पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही नाजूक हस्तनिर्मित कलाकृती बनविण्याची परंपरा आता जागतिक स्तरावर ओळख मिळवण्यासाठी सज्ज झाली आहे. गोवा विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषदेने हस्तकला, वस्त्राsद्योग आणि कॉयर खात्याच्या सहकार्याने या वस्तुंना भौगोलिक संकेत (जीआय) टॅग मिळावे यासाठी अर्ज दाखल करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या क्रोशे कलाप्रकारा बरोबरच अन्य प्रकारांमध्ये येथील स्थानिक परंपरांशी जोडलेले लामणदिवा, आगराचें मीठ या वस्तु, उत्पादनांनाही अद्वितीय आकृतिबंध आणि सांस्कृतिक प्रतीकात्मकता आहे.









