मनपाकडून चाचणी : स्थानिक पातळीवर विल्हेवाट लावण्याची शासनाकडून सूचना
प्रतिनिधी /बेळगाव
शहरात कचऱ्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने स्थानिक पातळीवर विल्हेवाट लावण्याची सूचना शासनाने केली आहे. त्यामुळे फुलांच्या निर्माल्यापासून अगरबत्ती आणि मच्छर अगरबत्ती बनविण्याचा प्रस्ताव मनपाने तयार केला आहे. याची चाचणी शुक्रवारी फूल मार्केटच्या आवारात करण्यात आली. फुलांच्या निर्माल्यापासून अगरबत्ती आणि मच्छर अगरबत्ती बनविण्याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
भाजीपाल्याच्या कचऱ्यासह शहरात घरोघरी मोठ्या प्रमाणात कचऱ्याची उत्पत्ती होत आहे. तसेच फूल मार्केटमध्येदेखील दररोज मोठ्या प्रमाणात निर्माल्या साचत आहे. सदर कचऱ्यावर प्रक्रिया करून खतनिर्मिती करण्यासाठी तुरमुरी कचराडेपोत नेले जाते. मात्र वाहतूक आणि कचरा भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. तसेच कचराडेपो परिसरात कचऱ्याचे डोंगर साचून दुर्गंधी पसरत आहे. ही बाब पर्यावरणास हानीकारक असल्याने स्थानिक पातळीवर कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची सूचना शासनाने केली आहे. कचऱ्याचे विघटन करून पुनर्रवापर तसेच खतनिर्मिती व विविध उपयोगी साहित्य निर्माण करण्याची सूचना केली आहे. त्यामुळे कचऱ्याचे विघटन करून प्लास्टिकचा कचरा सिमेंट कंपन्यांना पाठविला जातो. ओला कचरा तुरमुरी कचराडेपो तसेच बायोगॅस प्रकल्पात पाठविण्यात येतो. त्याप्रमाणे फूल मार्केटमध्ये निर्माण होणाऱ्या निर्माल्यापासून अगरबत्ती उत्पादनाचा प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव मनपाने तयार केला आहे. या प्रकल्पाची चाचणी शुक्रवारी घेण्यात आली. पर्यावरण साहाय्यक कार्यकारी अभियंते एच. व्ही. कलादगी यांच्या उपस्थितीत फूल मार्केट येथे प्रायोगिक तत्त्वावर अगरबत्ती उत्पादनाचे प्रात्यक्षिक करण्यात आले.
अगरबत्ती उत्पादनासाठी ग्रँडर व इतर यंत्रोपकरणाची आवश्यकता आहे. सदर प्रकल्प बीओटी तत्त्वावर राबविण्याचा प्रस्ताव आहे. हे उत्पादन तयार करण्यासाठी स्वसाहाय्य संघाची मदत घेतली जाणार आहे. याकरिता प्रायोगिक तत्त्वावर अगरबत्ती उत्पादनाचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. लवकरच याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.









