निविदा रद्द करा अन्यथा, अवमान याचिका दाखलचा इशारा : रियल इस्टेट एजंटांना पाठीशी घालण्याचा प्रकार
बेळगाव : कणबर्गी येथील शेतकऱ्यांनी पुन्हा बुडाला निवेदन दिले आहे. तातडीने आम्ही दिलेल्या निवेदनाची दखल घ्या अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा दिला आहे. कणबर्गी येथे 61 क्रमांक योजना राबविण्यात येत आहे. ती योजना राबवताना जमिनीचा सर्व्हे चुकीच्या पद्धतीने केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय झाला असून विरोध केलेल्या शेतकऱ्यांना तसेच न्यायालयात असलेल्या दाव्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी वगळून निविदा काढा, अशी मागणी करण्यात आली आहे. कणबर्गी येथे 61 क्रमांक स्कीम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये एकूण 157 एकर जमीन घेण्यात येणार होती. मात्र, त्यामधील काही शेतकऱ्यांनी बुडा विरोधात न्यायालयात जाऊन स्थगिती मिळविली. त्या काळात काही रियल इस्टेट एजंटांनी शेतकऱ्यांना भीती घालून जमिनी खरेदी-विक्री केल्या आहेत. हे सर्व व्यवहार उपनोंदणी कार्यालयामध्ये नोंद करून झाले आहेत. तेव्हा बुडाने संबंधितांवर कोणतीच कारवाई केली नाही. त्यामुळे एकप्रकारे काही शेतकऱ्यांना मुभा तर काही रियल इस्टेट एजंटांना पाठीशी घालण्याचा हा प्रकार असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.
तातडीने ‘ती’ निविदा रद्द करा
कणबर्गी येथील या योजनेच्या 50 हून अधिक एकर जमिनीमध्ये घरे झाली आहेत. तर 25 एकर जमिनीच्या शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात स्थगिती घेतली आहे. असे असताना संपूर्ण जमिनीचीच निविदा काढण्यात येत आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. तेव्हा तातडीने ती निविदा रद्द करा, याबाबत न्यायालयात अवमान याचिका दाखल करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. बुडाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी बबन मालाई यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते.









