वृत्तसंस्था/ लिस्बन
इस्माइली मुस्लिमांचे धार्मिक आणि अध्यात्मिक नेते आगा खान यांचे वयाच्या 88 व्या वर्षी निधन झाले आहे. आगा खान यांनी पोर्तुगालमध्ये अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या उत्तराधिकाऱ्याची घोषणा पुढील काळात केली जाणार आहे. आगा खान यांना 3 पुत्र आणि एक कन्या आहे. आगा खान यांचे मूळ नाव प्रिन्स शाह करीम अल हुसैनी होते. त्यांचा जन्म 13 डिसेंबर 1936 रोजी जिनिव्हा येथे झाला होता आणि त्यांचे बालपण केनियाच्या नैरोबी येथे गेले होते. हार्वर्ड विद्यापीठातून इस्लामिक इतिहासात पदवी मिळविणारे आगा खान वयाच्या 20 व्या वर्षीच इस्माइली मुस्लिमांचे अध्यात्मिक नेते झाले होते.
आगा खान यांची अनुमानित संपत्ती 800 दशलक्ष डॉलर्स ते 13 अब्ज डॉलर्सपर्यंत असल्याचे मानले जाते. त्यांनी विकसनशील देशांमध्ये सेवाकार्यासाठी मोठी देणगी दिली होती. 19 ऑक्टोबर 1957 रोजी टांझानियाच्या दार-ए-सलाममध्ये त्यांना अधिकृत स्वरुपात आगा खान चतुर्थची उपाधी देण्यात आली. आगा खान यांच्याकडे ब्रिटिश, फ्रेंच, स्विस आणि पोर्तुगालचे नागरिकत्व होते.
इस्लामिक संस्कृतीचे समर्थक आगा खान यांना मुस्लीम समाज आणि पाश्चिमात्य समाज यांच्यातील सेतू मानले जायचे. त्यांनी बांगलादेश, तजाकिस्तान आणि अफगाणिस्तानात अनेक हॉस्पिटल्स उभारली होती. आगा खान यांचे दोन विवाह झाले होते, पहिला विवाह 1969 मध्ये ब्रिटिश मॉडेल सारा क्रोकर पूलसोबत झाला, या विवाहातून त्यांना एक मुलगी आणि दोन मुलगे झाले. 1995 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. 1998 मध्ये त्यांनी जर्मनीच्या गॅब्रिएल लीनिंगनसोबत विवाह केला, या विवाहातून त्यांना एक मुलगा झाला. तर 2014 मध्ये आगा खान यांनी गॅब्रिएलकडून घटस्फोट घेतला होता.
इस्माइली मुस्लीम हे शिया इस्लामचे एका उप-संप्रदायाचे प्रतिनिधित्व करतात, त्यांना खोजा मुस्लीम, आगाखानी मुस्लीम आणि निजारी मुस्लीम देखील म्हटले होते. हा अनुयायांच्या संख्येप्रकरणी दुसरा सर्वात मोठा शिया उप-संप्रदाय आहे.









