72 वर्षीय वृद्धाला कोरोनाची लागण : दोघांवरही खासगी रुग्णालयात उपचार सुरू
बेळगाव : राज्यासह बेळगावातदेखील आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. येळ्ळूर येथील गर्भवतीनंतर निलजी येथील एका वृद्धालादेखील कोरोनाची लागण झाल्याचे सोमवारी निदान झाले असून दोघांवरही एका खासगी इस्पितळात उपचार सुरू आहेत. खबरदारी म्हणून बाधित रुग्णांच्या कुटुंबीयांसह त्यांच्या संपर्कात आलेल्यांची रॅपिड एंटिजेंट टेस्ट केली जात आहे. पुन्हा एकदा कोरोनाने बेळगाव तालुक्यात डोकेवर काढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे.
त्यामुळे आरोग्य विभागाकडून खबरदारी घेण्यासह संशयितांची चाचणी केली जात आहे. कोरोनाबाधित एका रुग्णाचा महाराष्ट्रात पहिला बळी गेला आहे. कर्नाटक राज्यातदेखील बाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. त्याचबरोबर काही महत्त्वाच्या सूचना आरोग्य विभागाने केल्या असून त्याचे पालन करावे, अशी सूचना केली आहे. दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील येळ्ळूर गावातील एका 25 वर्षीय गर्भवती महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले. तिला एका खासगी रुग्णालयात आयसोलेशन करण्यात आले आहे. या पाठोपाठ आता निलजी येथील एका 72 वर्षीय वृद्धाला कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाल्याने तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
निलजी येथील त्या कोरोनाबाधित रुग्णावरदेखील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. मात्र खबरदारी म्हणून बाधित रुग्णांच्या कुटुंबीयासह त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची रॅपिड एंटिजेंट टेस्ट केली जात आहे. येळ्ळूर व निलजी येथील 700 हून अधिक जणांची टेस्ट करण्यात आली आहे. बेळगावात गोळा केलेले नमुने हुबळी येथील प्रयोगशाळेला पाठविले जात आहेत. 64 हजार किट हुबळीला दाखल झाले आहेत. एकंदरीत बेळगाव तालुक्यात कोरोनाने शिरकाव केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.









