राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतून होणार हद्दपार : परिश्रम, सरावावर फेरणार पाणी
मडगाव : गोव्यात होणाऱ्या 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेला एक जबरदस्त धक्का बसण्याची चिन्हे दिसत आहेत. व्हॉलिबॉलनंतर आता हँडबॉल खेळही राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतून हद्दपार होण्याची शक्यता असून केवळ याची अधिकृत घोषणा होणे तेवढेच बाकी आहे. गोवा हँडबॉल संघटना आणि गोवा ऑलिम्पिक संघटनेच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांनी हँडबॉल खेळही गोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत असणार नाही, या वृत्ताला दुजोरा दिला आहे. यामुळे आता व्हॉलिबॉल आणि हँडबॉल या खेळातील इनडोअर आणि बीचवर खेळविण्यात येणारे एकूण चार खेळ राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील वेळापत्रकातून पुसले जाणार आहेत. सध्या व्हॉलिबॉल आणि हँडबॉल या खेळावरील प्रशासकीय प्रभुत्वासाठी लढाई न्यायालयात सुरू आहे. भारतीय व्हॉलिबॉल महासंघाची दोन शकले झाली असून वर्चस्वासाठी त्यांच्यात तिढा आहे. त्याच पद्धतीने हँडबॉलसाठी भारतीय हँडबॉल महासंघात दोन गट वर्चस्वासाठी न्यायालयात गेले आहेत.
हँडबॉलच्या दोन संघटनांतील वादाचा खेळाडूंना फटका
हँडबॉल फेडरेशन ऑफ इंडिया व हँडबॉल असोसिएशन ऑफ इंडिया असे हे दोन गट आहेत. हँडबॉल फेडरेशन ऑफ इंडिया व हँडबॉल असोसिएशन ऑफ इंडिया या दोन्ही गटानी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी झोनल संघांची यादी भारतीय ऑलिम्पिक संघटनेकडे पाठविली असून हा गुंता निर्माण झाला आहे.
सध्या तरी किट्स देऊ नये
भारतीय ऑलिम्पिक संघटनेने गोवा ऑलिम्पिक संघटनेकडे संपर्क साधून या प्रकाराची माहितीही दिली आहे. दरम्यान, गोवा ऑलिम्पिक संघटनेने एका किट्स वितरण करणाऱ्या आस्थापनाकडे संपर्क साधून हँडबॉल संघटनेला सध्या तरी किट्स देऊ नये, असे कळविले असल्याचे समजते. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बीच हँडबॉल खेळाचे 28 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत मिरामार बीचवर तर इनडोअर हँडबॉल स्पर्धेचे आयोजन 4 ते 8 नोव्हेंबर या कालावधीत नावेलीतील मनोहर पर्रिकर इनडोअर स्टेडियमवर होणार होते. स्पर्धेची तयारीही गोव्याच्या हँडबॉलपटूंनी केली होती. गोवा क्रीडा खात्याने यासाठी निवासी प्रशिक्षण शिबिरासाठी गोवा हँडबॉल संघटनेला लाखो रुपयांची रक्कमही दिली होती. मात्र आता हँडबॉल खेळ राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतून हद्दपार झाला तर एकूण चार खेळ गोव्यात होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या यादीतून जाणार आहेत.









