वृत्तसंस्था /सलालह (ओमान)
येथे सुरू असलेल्या आशियाई हॉकी फाईव्ह विश्वचषक पुरुषांच्या पात्र फेरीच्या स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने ओमानवर विजय मिळवला पण त्यानंतर पाकिस्तानने भारताचा 5-4 अशा गोलफरकाने निसटता पराभव केला. भारताने ओमानवर 12-2 असा विजय नोंदवला होता. भारतीय संघाला बुधवारी दोन सामने खेळावे लागले. सकाळच्या सत्रातील पहिल्या सामन्यात भारताने यजमान ओमानचा 12-2 असा दणदणीत पराभव केला. भारतातर्फे राहिल, राजबर आणि मनिंदर सिंग यांनी प्रत्येकी 3 गोल नेंदवत हॅट्ट्रीक केली. जुगराज सिंगने 2 तर सुखविंदरने एक गोल केला. ओमानतर्फे फहाद अल लेवाती आणि रशद अल फझारी यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवला. सामन्यात रहीलने दुसऱ्या, नवव्या आणि 30 व्या मिनिटाला, राजबरने 10 व्या, 11 व्या आणि 21 व्या मिनिटाला, मनिंदरने 16 व्या, 23 व्या आणि 26 व्या मिनिटाला, जुगराज सिंगने तिसऱ्या आणि 28 व्या मिनिटाला तर सुखविंदरने 29 व्या मिनिटाला गोल नोंदवले. ओमानच्या लवातीने 16 व्या तर फझारीने 18 व्या मिनिटाला गोल नोंदवले. या सामन्यात मध्यंतरापर्यंत 13 गोल नोंदवले गेले. या स्पर्धेतील मंगळवारी रात्री खेळवण्यात आलेल्या सामन्यात भारताने बांगलादेशचा 15-1 असा दणदणीत पराभव करून विजयी सलामी दिली होती. या सामन्यात मनिंदर आणि राहिल यांनी अनुक्रमे 4 आणि 3गोल नोंदवले होते.
बुधवारी सायंकाळच्या सत्रात झालेल्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने भारतावर 5-4 असा निसटता विजय मिळवला. या सामन्यात पाकिस्तानतर्फे ए. अस्लमने दोन गोल तर झिग्रिया हयात, अब्दुल रेहमान आणि अब्दुल राणा यांनी प्रत्येकी एक गोल केला. पाकने आक्रमक खेळावर अधिक भर देत सामना सुरू झाल्यानंतर दुसऱ्याच मिनिटाला आपले खाते अस्लमद्वारे उघडले. अस्लमने तिसऱ्या मिनिटाला आणखी एक गोल करून पाकची आघाडी वाढवली. हयातने पाचव्या मिनिटाला पाकचा तिसरा गोल केला. अब्दुल रेहमानने 13 व्या मिनिटाला तर अब्दुल राणाने 26 व्या मिनिटाला गोल नोंदवले. भारतातर्फे मनिंदर सिंगने 17 आणि 29 व्या मिनिटाला असे दोन गोल तर गुरुजोत सिंगने 12 व्या आणि मोहमद राहिलने 21 व्या मिनिटाला गोल केले.









