सर्वसामान्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले : बाजारपेठेत पुरवठा कमी, उत्पादनही कमी झाल्याची माहिती
वार्ताहर /मच्छे
वीज आणि भाजीपाल्याचे दर वाढल्याने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेला आता कडधान्य-डाळींच्या दरवाढीला सामोरे जावे लागत आहे. बाजारपेठेमध्ये कमी पुरवठा झाल्याने डाळींचे भाव अचानक वाढले आहेत. मसाल्यामध्ये जिऱ्याच्या दरातही दुप्पटीने वाढ झाली आहे. यामुळे सामान्य जनतेचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. गेल्या आठवड्यात तूरडाळीचा भाव 125 रुपये प्रतिकिलो होता. तो आता 160 रुपये झाला आहे. तर उडीद, मूग, चवळी, शेंगदाणे आणि चणा डाळींचा भाव प्रतिकिलोमागे किमान 25 रुपयांनी वाढला आहे. साधारणपणे सणासुदीचा हंगाम संपल्यानंतर पुरवठा कमी झाल्याने डाळी आणि धान्याच्या किमती किंचित वाढतात. मात्र यंदा सणासुदीच्या काळातच तुटवडा निर्माण झाला होता. अचानक भाव वाढण्याचे कारण घाऊक बाजारात अपेक्षेप्रमाणे डाळींचा पुरवठा होत नसल्याचे बोलले जात आहे. महागाईच्या आगडोंबापासून वाचण्यासाठी लोकांनी खरेदीचे प्रमाण कमी केले आहे. जिऱ्याच्या भावात अचानक दुप्पटीने वाढ झाल्याने खळबळ माजली आहे.
जिऱ्याच्या किमतीत वाढ का?
गुजरात आणि राजस्थानमधून जिऱ्याचा पुरवठा केला जातो. मात्र यावेळी तापमानात वाढ झाल्यामुळे उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे. साहजिकच राज्यात पुरवठा कमी असल्याने जिरे दरात दुप्पटीने वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
पिकांचे नुकसान व कृत्रिम साठा?
कलबुर्गी हे तूरीसाठी प्रसिद्ध आहे. मात्र गेल्यावर्षी अतिवृष्टी आणि रोगामुळे तूरीचे 70 टक्के पीक नष्ट झाले. त्यामुळे बाजारपेठेमध्ये यंदा तुरीच्या भावात कमालीची वाढ झाली आहे. अतिवृष्टीमुळे उडीद, चवळी आदी पिकेही हातची गेली आहेत. याशिवाय, यंदा राज्यात मान्सून पावसाने हुलकावणी दिल्यामुळे दरवाढीत आणखी भर पडणार अशी चिंता व्यक्त होत आहे. याचा गैरफायदा घेत बाजारातील काही घाऊक व्यापारी कृत्रिम टंचाई निर्माण करत असल्याची शंका किरकोळ व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.
खरेदी कमी केल्याने व्यवसायात 50 टक्के घट
गतवर्षी दुष्काळामुळे तुरीचे पीक उद्ध्वस्त झाले होते. अशीच परिस्थिती देशाच्या अनेक भागात निर्माण झाली होती. मागणीच्या प्रमाणात तांदळाचे उत्पादन जास्त होत नसल्याने महिन्याभरापूर्वीच तांदळाचे भाव वाढले आहेत. मात्र इतर धान्यांच्या दरात अशी वाढ झालेली नाही. नवीन पीक येईपर्यंत भाव वाढतच राहणार आहेत. भाज्यांसह डाळी आणि कडधान्यांच्या किमती गगनाला भिडल्याने लोक हैराण झाले आहेत. आता ग्राहकांनी खरेदी कमी केली आहे. त्यामुळे, गेल्या आठवड्यापासून व्यवसायात 50 टक्के घट झाली आहे.
– एक किराणा व्यापारी









