राजस्थानच्या राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राजस्थानमधील भाजप नेते सध्या दिल्लीत धाव घेत असल्याने राज्याच्या राजकारणात मोठा बदल होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. सोमवारी माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. दोघांमधील ही भेट सुमारे 20 मिनिटांपर्यंत चालली. तर मंगळवारी मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. ही भेट पूर्वनिर्धारित नव्हती, यामुळे अनेक कयास वर्तविले जाऊ लागले आहेत.
उलटसुलट चर्चा सुरू असताना राजस्थान मुख्यमंत्री कार्यालयाने वक्तव्य जारी केले आहे. राजस्थानला डबल इंजिन सरकार एक आदर्श राज्य म्हणून ओळख मिळवून देण्याच्या दिशेने काम करत आहे, राज्यात शेतकरी, युवा, महिला, गरीब, वंचित वर्गाला न्याय मिळत असून ते स्वत:च्या पूर्ण क्षमतेसह सन्मानाने जीवन जगत आहेत. पंतप्रधानांनी आगामी काळात राजस्थानला आणखी सहकार्य देण्याचे आश्वासन दिले असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटले आहे. या वक्तव्याद्वारे राजस्थानात नेतृत्वबदल होणार नसल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
वसुंधरा राजे गृहमंत्र्यांना भेटणार
वसुंधरा राजे या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटणार असल्याची माहिती समोर आली आहे. या गाठीभेटींमधून वसुंधरा राजे यांना मोठी जबाबदारी मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत. परंतु ही जबाबदारी कुठली असेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
राजस्थानच्या राजकारणात अस्वस्थता
दिल्लीत होत असलेल्या गाठीभेटींमुळे राजस्थानच्या राजकारणातील अस्वस्थता वाढली आहे. वसुंधरा राजे यांच्या राजकीय भविष्यावरून भाजप कुठला निर्णय घेते यावर सर्वांचे लक्ष असेल. भाजपमध्ये सध्या अध्यक्षपद रिक्त आहे, याचबरोबर उपराष्ट्रपतिपदासाठी लवकरच निवडणूक होणार आहे. यातील एक पद वसुंधरा राजे यांना मिळण्याची शक्यता आहे. राजस्थानचे अनेक भाजप नेते सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. अलिकडेच राज्याचे कृषिमंत्री डॉ. किरोडीलाल मीणा, उपमुख्यमंत्री दीया कुमारी, राज्यसभा खासदार घनश्याम तिवारी यांनी पक्षनेतृत्वाची भेट घेतली आहे.









