मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन : साळ, इब्रामपूर येथे बंधाऱ्याची पायाभरणी, सुमारे 350 कोटी ऊपये करणार खर्च
प्रतिनिधी /डिचोली
साळ व इब्रामपूर या गावात शापोरा नदीवर उभारण्यात येणारा मोठा बंधारा व संरक्षण भिंत या कामासाठी लागणाऱ्या निधीसाठी मार्च महिन्यातही आपण कर्ज घेण्यासाठी मान्यता दिली. कारण पुढील दोन वर्षांनंतर गोवा राज्याला कर्ज घेण्याची गरजच भासणार नाही. खाण व इतर व्यवहार तसेच मोपापासून गोवा सरकारला येणारा 36 टक्के भाग यामुळे सरकारच्या तिजोरीत चांगला महसूल येणार आहे. कर्ज घेण्याची गरजच पडणार नाही. मुख्यमंत्री या नात्याने पुढील 25 वर्षांचा विचार करून पाण्याची व्यवस्था करण्याचे काम साळ व इब्रामपूर भागात शापोरा नदीवर हाती घेण्यात आले आहे. या भागात पाणी साठवून ठेवण्याची क्षमता बरीच वाढविण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना साळ येथे सांगितले.
साळ व इब्रामपूर येथे मोठा बंधारा
शापोरा नदीवर साळ व इब्रामपूर येथे उभारण्यात येणारा मोठा बंधारा हा पूर्णपणे आधुनिक तंत्रज्ञान वापरून बांधला जात आहे. पुराच्या संरक्षणासाठी साळ व इब्रामपूर गावात नदीला लागून संरक्षण भिंती उभारण्याची तयारी आहे. पाण्याची साठा क्षमता वाढवली जात असून डिचोली, पेडणे, बार्देश या तालुक्यातील लोकांना भासणारी पाण्याची कमतरता या प्रकल्पातून भरून काढली जाणार आहे.
दोन्ही गावांना जोडणारा पूलही उभारणार
साळ व परिसरातील भागांना शुध्द पिण्याचे पाणी मिळण्यासाठी धुमासेत जलशुद्धीकरण प्रकल्प उभारला जाणार आहे. या कामासह दोन्ही गावांना व तालुक्यांना पुलाद्वारे जोडण्याचा संकल्प आहे. जर दोन्ही गावांतील नदीकिनारी असलेल्या जमिनींची ना हरकत मिळाल्यास तेही काम पूर्ण होणार असून चारचाकी वाहने या पुलांवरून जाऊ शकणार आहेत. अशी ही बहुउद्देशीय योजना आहे, असेही मुख्यमंत्री पुढे म्हणाले. डिचोली, पेडणे व बार्देश येथील जनतेला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी शापोरा नदीवर साळ व इब्रामपूर येथे उभारण्यात येणारा मोठा बंधारा आणि 250 एमएलडी पाणी पंपिंग स्टेशनच्या पयाभरणी समारंभात बोलताना मुख्यमंत्र्यांनी वरील माहिती दिली. यावेळी व्यासपीठावर जलस्रोत खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर, डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्यो, पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, जिल्हा पंचायत सदस्य प्रदीप रेवोडकर, सरपंच सावित्री घाडी, उपसरपंच देऊ राऊत, पंचसदस्य विशाल परब, निता राऊत, वैष्णवी परब, लाटंबार्सेचे सरपंच पद्माकर मळीक, जलस्रोत खात्याचे मुख्य अभियंता प्रमोद बदामी, इब्रामपुरचे सरपंच अशोक धावसकर व इतरांची उपस्थिती होती.
राज्यात शंभर बंधारे उभारणा : शिरोडकर
हा प्रकल्प सर्वप्रथम साळ व इब्रामपूर लोकांसाठी आहे. साळ व इब्रामपूर या दोन्ही बाजूंनी संरक्षण भिंती उभारण्याची योजना चालीस लावणार आहे. नदीतील गाळ उसपून येणाऱ्या पुरावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. पाणी दान करण्याचे पवित्र भाग्य साळ व इब्रामपूर गावाला लाभले आहे. त्यामुळे साळ गावाला पाण्याची कमतरता भासणार नाही. शिक्षण, औद्योगिकीकरण व जलसमृध्दी या त्रिसूत्री तत्वावर मुख्यमंत्री काम करीत असून त्याला प्रेरणा देण्याचे काम पंतप्रधान करीत आहे. त्याचा उल्लेख पंतप्रधान आपल्या ‘मन की बात’मध्ये करतात हे विशेष आहे. राज्यात जलसमृध्दीसाठी सर्व नद्यांवर 100 बंधारे उभारण्याचे ध्येय असून त्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे, असे जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले.
धुमासे प्रकल्पाचा पेडणेलाही फायदा : आर्लेकर
साळवासीयांनी सरकारला यापूर्वी सदैव सहकार्य केले आहे. त्यांच्याही अपेक्षा असून त्या सरकारने लक्षात घेऊन सोडवाव्यात. साळ गावात दरवर्षी पुर येतो. परंतु यावर्षी तिळारीतून पावसाळ्यात सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर नियंत्रण ठेवल्याने साळ गावात पुर आला नाही, पण हे संकट दरवर्षी पावसाळ्यात साळ गावाच्या डोक्यावर घोंघावत असते. या प्रकल्पाचा पेडणेला फायदा होणार आहे. 100 एमएलडी पाणी पेडणेसाठी मिळणार आहे, असे पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी आपल्या भाषणात म्हटले.
उत्तर गोव्यातील सर्वात महत्वाचा प्रकल्प
पिण्याच्या पाण्याची व जलसिंचनासाठी पाण्याची आवश्यकता पाहून राज्य सरकारने या महत्वपूर्ण प्रकल्पाचा आराखडा तयार केलेला आहे. या बहुउद्देशीय प्रकल्पामुळे डिचोली, पेडणे व बार्देश तालुक्यांची तहान भागणार आहे. पाण्यासाठी उत्तर गोव्यातील हा सर्वात महत्वाचा आणि मोठा प्रकल्प आहे. त्यासाठी डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्यो यांनी बरेच परिश्रम घेतले आहेत. याच प्रकल्पाला जोडून साळ गावातील पुराचा धोका कमी करण्यासाठी संरक्षण भिंत, त्यावर वॉकिंग ट्रॅक व सुशोभीकरण असा स्वतंत्र प्रकल्पही येणार आहे. नदीकिनारी संरक्षण भिंत व बंधाऱ्याच्या कामाची विधीवतपणे पायाभरणी करण्यात आली. मुख्यमंत्री व इतर मान्यवरांच्या हस्ते कोनशिला अनावरण करण्यात आले. तसेच समई प्रज्वलित करण्यात आली. स्वागत व प्रास्ताविक मुख्य अभियंता प्रमोद बदामी यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. दयानंद राव यांनी तर किरण नार्वेकर यांनी आभार मानले.









