सेन्सेक्समध्ये 267 अंकांची वाढ : अदानींचे समभाग तेजीत
वृत्तसंस्था / मुंबई
जागतिक बाजारात सकारात्मकतेचे संकेत व विदेशी गुंतवणूकदारांच्या परतण्याने तसेच आयटी, वित्त व ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांच्या कामगिरीच्या जोरावर भारतीय शेअरबाजार सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी तेजीसह बंद झाला. गुरुवारी व शुक्रवारी दोन सत्रात शेअरबाजार घसरणीसह बंद झाला होता.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 267 अंकांनी वाढत 65,216.09 अंकांवर तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 83 अंकांनी वधारत 19393.60 बंद झाला. आयटी, धातू या क्षेत्राच्या निर्देशांकांनी 1 टक्का वाढत बाजाराला आधार दिला. याचदरम्यान सोमवारी गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 3.49 लाख कोटींनी भर पडली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा निर्देशांक मात्र घसरणीसोबत बंद झाला आहे. दिग्गज उद्योजक मुकेश अंबानी यांचा जियो फायनान्शीयल सर्व्हिसेसचा समभाग सोमवारी बाजारात 265 रुपयांवर लिस्ट झाला.
हे समभाग तेजीत..
निफ्टीत बजाज फायनान्स, अदानी पोर्ट्स, पॉवरग्रिड कॉर्प व अदानी एंटरप्रायझेस यांचे समभाग सर्वाधिक वाढताना दिसले. रिलायन्स इंडस्ट्रिज, महिंद्रा आणि महिंद्रा, ब्रिटानिया इंडस्ट्रिज, एसबीआय लाइफ इन्शुरन्स आणि बजाज ऑटो यांचे समभाग मात्र घसरणीत होते. सेन्सेक्समध्ये पाहता पॉवरग्रिडचे समभाग 2.58 टक्के इतके वाढले होते. इंडसइंड बँक, एनटीपीसी, भारती एअरटेल, आयटीसी, बजाज फिनसर्व्ह, इन्फोसिस आणि नेस्ले यांचे समभाग 1 टक्का वाढत बंद झाले. यांच्यासोबत टाटा स्टील, टीसीएस, टायटन, अॅक्सिस बँक, लार्सन टुब्रो, टाटा मोटर्स, एशियन पेंटस्, एचसीएल टेक आणि एचयुएल यांनी तेजी दाखवत बाजाराला आधार देण्याचे काम केले.
हे समभाग घसरणीत
जियो फायनान्सचे समभाग सरतेशेवटी 5 टक्के घसरणीत बंद झाले. रिलायन्स इंडस्ट्रिज, महिंद्रा आणि महिंद्रा, मारुती, एसबीआय, यांचे समभाग घसरणीत राहिले.









