एनसीसीएफ’ केंद्रांमध्ये आजपासून 25 रुपये किलोने विक्री
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने हस्तक्षेप करत आहे. गेल्या महिन्यात टोमॅटोचे दर भडकल्यानंतर सरकारने सर्वसामान्यांना स्वस्त दरात टोमॅटो उपलब्ध करून दिला. त्यानंतर आता सरकार कांदाही स्वस्त दरात उपलब्ध करून देणार आहे. याअंतर्गत लोकांना 25 रुपये किलो दराने कांदा मिळणार आहे. सोमवार, 21 ऑगस्टपासून सवलतीच्या दरात कांद्याची विक्री सुरू होणार आहे. स्वस्त दरात कांद्याची ही विक्री सहकारी संस्था नॅशनल को-ऑपरेटिव्ह कंझ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेडद्वारे (एनसीसीएफ) केली जाईल. सोमवारपासून ‘एनसीसीएफ’ 25 रुपये प्रतिकिलो या सवलतीच्या दराने कांद्याची विक्री करेल, असे सरकारी पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. यापूर्वी शनिवारी सरकारने कांद्याच्या निर्यातीवर निर्बंध लादर करशुल्क 40 टक्क्यांपर्यंत वाढवले होते. निर्यातीवरील ही बंदी 31 डिसेंबर 2023 पर्यंत लागू राहणार आहे.
टोमॅटोपाठोपाठ आता कांदाही सर्वसामान्यांच्या अडचणीत वाढ करू शकतो. सप्टेंबरपासून त्याच्या दरात मोठी वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच येत्या काही महिन्यांत सणासुदीच्या काळात महागाईचा लोकांना फारसा त्रास होऊ नये म्हणून सरकारने तयारीला वेग दिला आहे. देशांतर्गत बाजारपेठेतील कांद्याची मागणी पूर्ण करण्यासाठी आणि देशांतर्गत बाजारात कांद्याचे भाव टोमॅटोप्रमाणे गगनाला भिडू नयेत यासाठी योग्य ती काळजी घेतली जात आहे.
कांद्याच्या किमती नियंत्रित करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून सरकारने त्याच्या बफर स्टॉकची मर्यादाही वाढवली आहे. यापूर्वी कांद्याची बफर मर्यादा 3 लाख मेट्रिक टन निश्चित करण्यात आली होती. निर्धारित उद्दिष्टानुसार खरेदी झाल्यानंतर आता सरकारने ती वाढवून 5 लाख टन केली आहे. सरकारने एनसीसीएफ आणि नाफेड या दोन्ही सहकारी संस्थांना प्रत्येकी 1 लाख टन अतिरिक्त कांदा खरेदी करण्यास सांगितले आहे. दुसरीकडे, सरकारने बफर स्टॉकमधून कांदा बाजारात पाठवण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत राखीव भागातून सुमारे 1,400 टन कांदा बाजारात आला आहे.