खरेदीसाठी बाजारात वर्दळ : कुटुंबीयांची लगीनघाई
बेळगाव : तुळशी विवाहानंतर आता शहर परिसरात लग्नसराईची धामधूम सुरू झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा विवाह मुहूर्त अधिक आहेत. त्यामुळे लग्नसराईच्या हंगामाला प्रारंभ झाला आहे. लग्नसराईमुळे बाजारपेठेत उलाढाल वाढू लागली आहे. गणेश चतुर्थी, दसरा आणि दिवाळीनंतर तुळशी विवाह साजरा झाला. तुळशी विवाहानंतर लग्न सोहळ्यांचे आयोजन केले जाते. त्यामुळे डिसेंबरमध्ये शुभ मुहूर्तावर विवाह सोहळे होऊ लागले आहेत. डिसेंबरच्या 6, 7, 9 आणि 15 तारखेला मुहूर्त आहेत. त्यामुळे या मुहूर्तांवर लग्नाचा बार उडणार आहे. लग्न सोहळ्यांना प्रारंभ झाल्याने बाजारपेठेत भांडी, कपडे, सोने-चांदी खरेदीला ऊत येऊ लागला आहे. लग्नसराईच्या हंगामाला प्रारंभ झाल्याने वधू-वर मंडळांचीही चलती पाहावयास मिळत आहे. त्याचबरोबर लग्नासाठी कार्यालये, सभागृह, लग्नपत्रिका, बँड, घोडेवाला, भटजी आदींची रेलचेल पाहावयास मिळत आहे. लग्न बाजाराच्या खरेदीसाठी नागरिकांची वर्दळ वाढू लागली आहे. घरोघरी तुळशी विवाह झाल्यानंतर लग्नाच्या मुहूर्तांना प्रारंभ झाला आहे. आगामी नववर्षात जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये अधिक मुहूर्त आहेत. त्याचबरोबर मार्च आणि एप्रिलमध्येही जादा मुहूर्त आहेत. त्यामुळे कुटुंबीयांची खरेदीसाठी लगीनघाई सुरू झाली आहे. डिसेंबर आणि जानेवारीतील मुहूर्तांवर शुभविवाह आयोजित केलेल्या कुटुंबीयांची तयारी सुरू झाली आहे.









