इस्रो ऑक्टोबरमध्ये अंतराळयान पाठणार : महिला रोबोटनंतर अंतराळवीर पाठविण्याची तयारी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चांद्रयान-3 च्या यशानंतर इस्रोने गगनयान प्रकल्पावर लक्ष केंद्रित केले आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात या मोहिमेअंतर्गत अवकाशात एक यान पाठवले जाईल. मानवनिर्मित मोहिमेच्यावेळी हे अंतराळयान ज्या मार्गावरून गेले होते त्याच मार्गावरून परत यावे हे ठरवण्याचा त्याचा उद्देश असल्याचे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी शुक्रवारी एका खासगी वाहिनीशी बोलताना स्पष्ट केले.
अंतराळयानाच्या यशस्वी चाचणीनंतर महिला रोबोट व्योमित्रला अंतराळात पाठवले जाईल. व्योमित्र मनुष्याप्रमाणे सर्व क्रिया करू शकेल. पहिल्या टप्प्यात सर्व काही सुरळीत झाल्यास मानव मोहिमेची आमची तयारी असल्याचेही केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्ट केले. तसेच अंतराळवीरांना अवकाशात पाठवण्याबरोबरच त्यांना परत आणणेही आमच्यासाठी आव्हानात्म आणि महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
गगनयान या पहिल्या मानवी अंतराळ-उडान मोहिमेचा भाग म्हणून इस्रो वर्षाच्या अखेरीस दोन प्रारंभिक अंतराळ मोहिमा पाठवेल. एक मोहीम पूर्णपणे मानवरहित असेल. दुसऱ्या मोहिमेत व्योमित्र नावाचा महिला रोबो पाठवण्यात येणार आहे. गगनयान रॉकेट त्याच मार्गावरून सुरक्षितपणे परत येईल. या दोन्ही मोहिमा यशस्वीपणे पार पडल्यानंतरच 2024 मध्ये मानवाला अवकाशात पाठवले जाईल, असे जितेंद्र सिंह यांनी स्पष्ट केले.
तिसऱ्या मोहिमेच्या अंतराळ उड्डाणात दोन मानव पाठवले जाऊ शकतात. हे लोक 7 दिवस अंतराळात राहतील. या मोहिमेसाठी भारतीय हवाई दलाच्या चार वैमानिकांना रशियाला पाठवून त्यांना अंतराळ प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण देण्यात येत आहे. भारतीय हवाई दलातील चार वैमानिकांपैकी एक ग्रुप पॅप्टन आहे. उर्वरित तीन विंग कमांडर असून ज्यांना गगनयान मोहिमेसाठी तयार केले जात आहे.









