पहिल्या टप्प्यात 10 ठिकाणी बसविणार : सुरतनंतर बेळगावात भूमिगत डस्टबीन
बेळगाव : महापालिकेने शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी व शहर स्वच्छ ठेवण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शहराच्या दक्षिण भागात भूमिगत डस्टबीन बसविण्यात आले आहेत. सुरतनंतर बेळगावात भूमिगत डस्टबीन बसविण्यात आले आहेत. दक्षिण प्रमाणेच आता उत्तर मतदारसंघातदेखील भूमिगत डस्टबीन बसविण्याचा विचार महापालिकेने चालविला आहे. महानगरपालिकेने गेल्या दोन वर्षापूर्वी 15 व्या वित्त आयोगातून पहिल्या टप्प्यात दक्षिण मतदारसंघात 24 ठिकाणी भूमिगत डस्टबीन बसविले आहेत. डस्टबीनमध्ये टाकलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी 1.85 कोटी रुपये खर्ची घालून हैड्रोलिक क्रेन वाहन खरेदी करण्यात आले आहे. अत्याधुनिक बेलिंग मशीन, प्लास्टिक स्पडींग मशीन, जेसीबी प्रकारचे लोडर वापरण्यात येत आहेत.
24 ठिकाणी भूमिगत डस्टबीन
पहिल्या टप्प्यात आनंदवाडी, पी. के. क्वॉर्टर्स, खासबाग, ओल्ड पी. बी. रोड, वडगाव, ओमकारनगर, शिवचरित्र रोड, उद्यमबाग उत्सव हॉटेलनजीक, शहापूर स्मशान रोड, धामणे रोड वडगाव, अनगोळ आंबेडकर गल्ली, झटपट गल्ली, बाबले गल्ली, संत रोहिदास कॉलनी मजगाव रोड, मजगाव कन्नड शाळा, भाग्यनगर चौथा क्रॉस, अनगोळ नाका, खानापूर मुख्य रोड इंडियन ऑईल नजीक, टिळकवाडी बुधवार पेठ, गोवावेस, जक्केरी होंडा, हिंदवाडी कुस्ती आखाडा, हिंदवाडी लिंगायत स्मशानभूमी, शांतीनगर नालानजीक, मंडोळी रोडसह 24 ठिकाणी भूमिगत डस्टबीन बसविण्यात आले आहेत.
एका डस्टबीनसाठी 6.5 लाख रुपये खर्च
एका डस्टबीनसाठी 6.5 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. भूमिगत डस्टबीन उचलण्यासाठी कंटेनरमध्ये क्रेन ऑपरेटर व्यवस्था आहे. सदर भूमिगत डस्टबीनमध्ये कचऱ्याचे वर्गीकरण करून टाकण्याऐवजी अनेकजण एकत्र कचरा टाकत आहेत. त्याचबरोबर डस्टबीन कचरा टाकण्याऐवजी बाहेर कचरा फेकून दिला जात आहे. त्यामुळे परिसरात पुन्हा दुर्गंधीचे वातावरण निर्माण होत आहे. मोकाट जनावरे आणि कुत्र्यांचा वावरदेखील वाढला आहे. त्यामुळे अलीकडेच कचरा टाकणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी भूमिगत डस्टबीनच्या आवारात 10 सीसी कॅमेरे बसविण्यात आले आहेत. विश्वेश्वरय्यानगर येथील स्मार्ट सिटीच्या कमांड कंट्रोल सेंटरमधून नजर ठेवली जात आहे.
डस्टबीन 310 टन क्षमतेचे
दक्षिण मतदारसंघातील भूमिगत डस्टबीन व्यवस्था यशस्वी झाली असल्याने महापालिका आता उत्तर मतदारसंघात पहिल्या टप्प्यात 10 भूमिगत डस्टबीन बसविण्यासाठी पुढे सरसावली आहे. सध्या दक्षिण मतदारसंघात 24 ठिकाणी बसविण्यात आलेले भूमिगत डस्टबीन 310 टन क्षमतेचे आहेत. तसेच त्यांना सेन्सरदेखील आहे.









