यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नवी दिल्लीत 21 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी असे तीन दिवस होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षा लोकसाहित्याच्या अभ्यासिका डॉ. तारा भवाळकर आहेत तर स्वागताध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारकडून मिळाला आहे, त्यामुळे संमेलनात आनंदाचे वातावरण आहे. शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही समक्ष भेटून संमेलनाचे निमंत्रण दिले आहे. संमेलनात विविध कार्यक्रम होणार आहेतच पण या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी महाराष्ट्र सदनात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘महादजी शिंदे राष्ट्रगौरव’ पुरस्कार शरद पवार यांच्या हस्ते व ज्योतिरादित्य सिंधिया, मुरलीधर मोहोळ, शिल्पकार राम सुतार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आला. आणि मराठी संस्कृतीच्या दृष्टीने तो योग्य होता पण या सत्कारावरुन आता महाराष्ट्रात विरोधी महाआघाडीत जुंपली आहे. शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना धुळवडीच्या मुडमध्ये दिसते आहे. इंडीया आघाडीची वाट ज्या दिशेने
सुरु आहे तीच दिशा आता महाराष्ट्रात दिसते आहे. अलीकडे अखिल भारतीय साहित्य संमेलने वेगवेगळ्या वादांनी रंगलेली दिसतात. निवडणूक, वेगवेगळे गट, चिखलफेक आणि राजकारण यामुळे अनेक साहित्यिक संमेलनाच्या अध्यक्षपदाकडे ढुंकूनही पहात नाहीत पण लोकशाही म्हटले की निवडणूक आलीच आणि या निमित्ताने सारे जण वेगळाच खेळ खेळतात व वाद उठवून टीकाटिपणी करत राहतात. यंदा असे वादळ उठले नव्हते. त्यामुळे साहित्य क्षेत्रात कुजबुज सुरु होती पण ती वादळापूर्वीची म्हणावी लागेल. एकनाथ शिंदेंना शरद पवार यांच्या हस्ते महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार देण्यात आला आणि राजकारणी मंडळी चिखलफेकीसाठी सरसावली. आता यात साहित्यिक कशा उड्या मारतात, वात्रटिका करतात आणि बोरू झिजवतात हे पुढे पहावे लागेल. पण संमेलनाला जान आली आहे, संमेलनाला पंतप्रधान हजेरी लावणार असे दिसते आहे. त्यामुळे त्यांचे स्वागत डावे, उजवे कसे करतात हे पण बघावे लागेल. यंदाचे संमेलनही आपली वाद आणि धुळवड परंपरा पाळणार असे दिसते आहे. महाराष्ट्र सदनात झालेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्यात ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मराठीतून भाषण केले. उच्चार व शब्द यांच्या मर्यादा लक्षात घेऊनही त्यांचे या सोहळ्यातील भाषण मराठी माणसांना आत्मभान देणारे होते असे म्हणावे लागेल. अटक ते कटक मराठा राज्य, त्यागाची, बलीदानाची, शौर्याची परंपरा, इतिहास आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे हिंदवी स्वराज्य, ‘बचेंगे तो और भी लढेंगे’ बाणा आणि ‘दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र माझा’ असे संदर्भ देत गावोगावी मराठा संमेलने झाली पाहिजेत व आपली परंपरा, बांधिलकी रुजवली पाहिजे असे सांगताना आपण सिंधिया नाही शिंदे आहोत असे ते म्हणाले व एकनाथ शिंदे यांना लढवय्या म्हणत त्यांनी गौरवले. शरद पवार यांनीही एकनाथ शिंदे यांची स्तुती केली. त्यांच्या कामाचा गौरव केला. शिंदेचा जावई शिंदेचा सत्कार करतोय यावर बोट ठेवत शिंदेची कारकीर्द उत्तम होती असे प्रमाणपत्र त्यांनी दिले. मात्र या स्तुतीचा, गौरवाचा महाआघाडीत भडका उडला. मिंधेचे कौतुक आणि तेही शरद पवार यांच्याकडून. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे प्रवत्ते संजय राऊत खवळले. त्यांच्यावर पवारांचा माणूस असा शिक्का असला तरी त्यांनी आपली ठाकरी तोफ पवारांच्या दिशेने वळवली आणि महाराष्ट्र द्रोही, गद्दार, शिवसेना फोडणाऱ्या आणि शहाला मिळून बाळासाहेब ठाकरेंच्या सेनेत फूट पाडणाऱ्यांचा सत्कार कसा करता असे सवाल केले. संमेलन, आरएसएस यांच्यावरही त्यांनी जीभ चालवली व ‘आम्हालाही राजकारण कळतं बरं पवार साहेब’ असा इशारा दिला. उद्धव ठाकरे यांनीही तीच रि ओढली आणि संमेलनात आणि राजकारणात वादाची ठिणगी पडली. राऊत यांच्या टीकेचा धुरळा खाली बसायच्या आत अमोल कोल्हे यांनी प्रतिहल्ला केला आहे आणि शिंदेंची शिवसेनाही राऊत यांच्या टीकेनंतर गप्प राहिलेली नाही. संजय राऊत केवळ शरद पवारांना लक्ष करुन थांबलेले नाहीत. त्यांनी संमेलनावर बहिष्कार घालणार असा मनोदय व्यक्त केला आहे. आपल्याला पण संमेलनाचे निमंत्रण आहे पण जाणार नाही. हे कसले संमेलन असे म्हणत त्यांनी संमेलन संयोजकावरही राग आळवला आहे, महाविकास आघाडीबद्दलही राऊत बोलले आहेत. दिल्लीत आप आणि कॉंग्रेस यांचा दारुण पराभव आणि इंडिया आघाडीत असलेले मतभेद याला या सत्कार सोहळ्याने व ठाकरी टीकेने तडका बसला आहे. महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे. शरद पवार काय बोलतात ते बघायचे पण अमोल कोल्हे यांनी ‘तूर्राला आरसा दाखवू नका.’ राजकारणात सुसंस्कृतपणा हवा, पवार साहेबांनी जे केले ते चुकीचे नाही असे म्हणत आम्ही योग्य आहोत असे दाखवून दिले. आता साहित्य संमेलनात याचे काय व कितपत पडसाद उमटतात बघावे लागेल. डॉ. तारा भवाळकर अध्यक्षीय भाषणात काय बोलतात तसेच महाविकास आघाडीच्या एकतेवर या टीकेचा काय परिणाम होतो हे बघावे लागेल. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव, केंद्रात, राज्यात सत्ता नाही आणि दिल्लीतही आपचा कॉंग्रेसचा दारुण पराभव यामुळे विरोधी आघाडीत घालमेल, अस्वस्थता निर्माण झालीच आहे. ती निमित्त शोधून व्यक्त होते आहे. तूर्त संमेलन, सत्कार आणि झोंबलेल्या मिरच्या यामुळे वातावरण वादग्रस्त झाले आहे. नरेंद्र मोदी संमेलनात हजेरी लावलात का? आणि काय बोलतात हे पहावे लागेल, पण संमेलनात वाद ही परंपरा कायम आहे. आणि दिल्ली असो गल्ली असो मराठी माणूस आपला बाणा सोडत नाही हे अधोरेखित झाले आहे.








