भाजप आमदार यत्नाळ यांचे सोनिया गांधींविषयी वादग्रस्त वक्तव्य
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यात निवडणूक प्रचाराला रंगत आली असतानाच वैयक्तिक पातळीवर आरोप सुरूच आहेत. गुरुवारी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद मोदींना ‘विषारी साप’ असे संबोधले होते. त्यावरून संतप्त पडसाद उमटलेले आहेत. असे असताना आता काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्यावर आरोप करताना भाजप नेते बसनगौडा पाटील-यत्नाळ यांची जीभ घसरली. सोनिया गांधी या ‘विषकन्या’ नव्हेत का? असे वादग्रस्त वक्तव्य यत्नाळ यांनी केले आहे. त्यामुळे काँग्रेसने यत्नाळ यांच्यावर सडकून टीका केली आहे.
कोप्पळमध्ये भाजपच्या सभेत बोलताना बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी जर पंतप्रधान मोदी विषारी साप असतील, तर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी विषकन्या नव्हेत का?, असा प्रश्न केला. त्याचप्रमाणे राहुल गांधी हे वेडे आहेत, अशी टिकाही त्यांनी केली.
विरोधी पक्षनेते सिद्धरामय्यांवरही यत्नाळ यांनी टीका केली. लिंगायतांना भ्रष्ट म्हणणाऱ्या सिद्धरामय्या यांनी आमच्यावर वैयक्तिक टीका करावी. मात्र, संपूर्ण समुदायावर ते टीका करत आहे. हिंमत असेल तर त्यांनी लिंगायत मुख्यमंत्र्याची घोषणा करावी, असे आव्हान दिले.
भाजपमधून हकालपट्टी करण्याची काँग्रेसची मागणी
सोनिया गांधी यांना विषकन्या असे संबोधलेल्या बसनगौडा यत्नाळ यांची भाजपमधून हकालपट्टी करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी केली. बेंगळूरमधील पक्षाच्या कार्यालयात पत्रकारांशी बोलताना त्यांनी यत्नाळ यांनी जाहीर माफी मागावी. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनीही माफी मागावी, अशी मागणी केली.
यत्नाळ यांनी एका प्रतिष्ठित महिलेचा अपमान केला आहे. हिंमत असेल तर जे. पी. न•ा यांनी यत्नाळ यांची पक्षातून हकालपट्टी करावी. नेहरु आणि गांधी कुटुंबाविषयी अपशब्द वापरण्याची भाजप नेत्यांना घाणेरडी सवय आहे, असेही ते म्हणाले.
केंद्रीयमंत्री करंदलाजे यांच्याकडून वक्तव्याचे खंडन
आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे केंद्रीयमंत्री शोभा करंदलाजे यांनी खंडन केले आहे. यत्नाळ यांच्या वक्तव्याचे आम्ही समर्थन करत नाही. अशी विधाने करण्याची भाजपची संस्कृती नाही. यत्नाळ यांनी इतर पक्षातील नेत्यांबद्दल अशा प्रकारची विधाने करणे योग्य नाही, असे करंदलाजे यांनी म्हटले आहे.









