फुटीर आमदारांना उत्तर देण्यासाठी बजावल्या नोटीसा : दीड महिन्याची मुदत, पुढील सुनावणी एप्रिलमध्ये
पणजी : अपात्रता याचिका प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्याने नोटीसा बजावल्यानंतर सभापती रमेश तवडकर यांनी त्याची तातडीने दखल घेऊन काल सोमवारी त्यावर सुनावणी करताना 8 फुटीर काँग्रेस आमदारांना उत्तर देण्यासाठी 6 आठवड्यांची नोटीस जारी केली आहे. तसेच पुढील सुनावणी 5 एप्रिल रोजी निश्चित केली आहे. डॉमनिक नोरोन्हा यांनी 8 फुटीर काँग्रेस आमदारांविरोधात सभापतीकडे याचिका दाखल केली होती, तर काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अमित पाटकर यांनी मायकल लोबो व दिगंबर कामत यांनी पक्षविरोधी कारवाया केल्या म्हणून त्यांना अपात्र करावे अशी याचिका सादर केली होती. दोन्ही याचिकांवर सभापती रमेश तवडकर यांनी काहीच कार्यवाही केली नव्हती.
चोडणकरांनी प्रकरण नेले कोर्टात
काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांनी हे अपात्रता याचिका प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा पीठात नेल्यानंतर न्यायालयाने सभापतींना जेव्हा नोटीस बजावली तेव्हा सभापतींनी या प्रकरणी नोंद घेतली आणि सुनावणी केली.
पाटकरांच्या याचिकेवरही सुनावणी
पाटकर यांच्या याचिकेवरही तवडकर यांनी सुनावणी घेतली. लोबो व कामत यांचे वकील त्यावेळी उपस्थित नव्हते, परंतु त्या दोघांच्या वतीने उत्तर सभापतींना सादर करण्यात आले. काँग्रेसतर्फे अॅड. अभिजित गोसावी हजर होते. सदर अपात्रता याचिकेवरील सुनावणी 6 मार्च रोजी ठरवण्यात आली आहे.n दोन्ही याचिकांवर आता सभापतींसमोर सुनावणी चालू झाल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे ते 90 दिवसात त्याचा निकाल लावतील, अशी आशा निर्माण झाली आहे. फुटीरांचे भवितव्य आता सभापतींच्या हातात आहे.









