स्वदेशनिर्मित ‘मत्स्य‘ मौल्यवान धातूंचा घेणार सहा हजार मीटर खोलीवर शोध
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
चंद्राच्या दक्षिण ध्रुवानजीक यान उतरविणारा जगातील प्रथम देश ठरल्यानंतर आता भारताने सागरतळ धुंडाळण्याचे नवे महत्त्वाकांक्षी अभियान हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी भारतीय संशोधकांनी व्यापक योजना सज्ज केली आहे. स्वदेशनिर्मित ‘मत्स्य’ या पाणबुडीसदृश वाहनातून हा शोध घेतला जाणार आहे. या अभियानाला ‘समुद्रयान’ असे नाव देण्यात आले आहे. मत्स्य या वाहनातून 3 संशोधकही समुद्रतळापर्यंत पाठविले जाणार आहेत.
समुद्राच्या तळाशी कोबाल्ट, निकेल, मँगेनिझ आणि तत्सम मौल्यवान धातू मोठ्या प्रमाणावर सापडण्याची शक्यता आहे. यासंबंधीचा अहवाल भूगर्भ आणि सागर संशोधकांनी दिला आहे. याची पडताळणी करण्यासाठी हे अभियान हाती घेण्यात येणार आहे. समुद्रतळाशी जाणाऱ्या वाहनाला ‘मत्स्य-6000’ असे नाव देण्यात आले असून त्यात अत्याधुनिक सामग्री बसविण्यात आली आहे.
समुद्र जीवांचाही अभ्यास होणार
या मोहिमेचा उद्देश केवळ मौल्यवान धातू किंवा हैड्रोथर्मल सल्फाईडस्, तसेच गॅस हैड्रेटस् शोधणे हा नसून समुद्रतळाशी असणाऱ्या जीवसृष्टीचा अभ्यास करणे हादेखील आहे. समुद्राच्या तळाशी, अनेक प्रकारच्या, अतिथंड तापमानात आणि अतिदाबाच्या स्थानी तग धरण्याची क्षमता असणाऱ्या सजीवांचे वास्तव्य आहे. अमेरिका आणि इतर काही विकसित देशांनी त्यांचा काही प्रमाणात अभ्यास केला आहे. आता भारतही या क्षेत्रात आपले पाय भक्कमपणे रोवणार आहे.
पुढील वर्षाच्या आरंभापासून…
हे अभियान पुढील वर्षाच्या आरंभापासून हाती घेण्यात येत आहे. 2024 च्या पहिल्या तिमाहीत मत्स्य या सागर वाहनाचे समुद्रात 500 मीटर खोलीवर परीक्षण करण्यात येईल. त्यानंतरच्या टप्प्यांमध्ये खोली वाढविण्यात येणार असून 2026 पर्यंत सहा हजार मीटर खोलीवरचे संशोधन करण्यात येईल. समुद्राची खोली सर्वसाधारणत: 6 ते 7 हजार मीटर इतकी असते. समुद्रतळाच्या गाभ्यातही शिरकाव करण्याचे भारताचे ध्येय आहे. ही माहिती केंद्र सरकारच्या पृथ्वी विज्ञान विभागाचे सचिव एम. रविचंद्रन यांनी सोमवारी पत्रकारांना दिली.
भक्कम रचना
मत्स्य या वाहनाची रचना संपूर्णत: स्वदेशी आहे. या वाहनात तीन मीटर व्यासाचा एक सुरक्षित कक्ष उपलब्ध असून त्यात तीन संशोधकांच्या वास्तव्याची व्यवस्था करण्यात आली आहे. हा कक्ष टिटॅनियमच्या संयुगापासून निर्माण करण्यात आला असून त्याची जाडी 80 मिलीमीटर आहे. समुद्राच्या तळाशी असणारा दाब हा त्याच्या पृष्ठभागावर असणाऱ्या दाबापेक्षा 600 पट अधिक असतो. तो सहन करण्याची या कक्षाची आणि वाहनाची क्षमता आहे, अशी माहिती देण्यात आली.
ऑक्सिजनची पुरेशी व्यवस्था
या कक्षात श्वसनासाठी ऑक्सिजनची पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे. हे वाहन समुद्रतळाशी सलग 12 ते 16 तास काम करु शकणार आहे. मात्र ऑक्सिजनची व्यवस्था 96 तासांसाठी करण्यात आली आहे. साधारणत: 16 तासांनंतर हे वाहन पुन्हा समुद्राच्या पृष्ठभागाशी आणण्यात येणार आहे. नंतर त्यात पुन्हा आवश्यक ती साधने भरुन ते सागरतळाशी पाठविण्यात येणार आहे. अशाप्रकारे ते अनेक वर्षे कार्यरत राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
आतापर्यंत केवळ 5 देश…
समुद्रतळाशी जाऊन संशोधन करण्याचे अभियान आतापर्यंत अमेरिका, रशिया, फ्रान्स, जपान आणि चीन या पाचच देशांनी हाती घेतलेले आहे. भारत आता त्यांच्या पंक्तीत जाणार आहे. तो असे अभियान हाती घेणारा जगातील सहावा देश ठरणार असून या संशोधनातून होणाऱ्या अभ्यासाचा उपयोग अनेक महत्त्वाच्या कारणांसाठी केला जाणार आहे. भारताची अर्थव्यवस्था अधिक प्रबळ करण्यासाठीही या संशोधनाचे साहाय्य होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
आत्मनिर्भरतेच्या वाटेवर…
ड स्वदेशनिर्मित सागर यानातून होणार सागर तळाचे महत्त्वाचे संशोधन
ड मौल्यवान धातूंचा शोध लागल्यास अर्थव्यवस्थेला मिळणार मोठे बळ
ड 2026 च्या प्रारंभी हाती घेतला जाणार या अभियानाचा अंतिम टप्पा









