36 महिन्यांपासून पडला नाही पाऊस
स्पेनमध्ये मागील 36 महिन्यांमध्ये पाऊस जवळपास पडलाच नाही. याचमुळे बहुतांश नद्या, तलाव, जलस्रोत वेगाने आटत चालले आहेत. सॅन रोमन डे साउ गावातील साउ जलाशयाची पाणीपातळी 1990 नंतर सर्वात वेगाने नीचांकी स्तरावर पोहोचली आहे. यामुळे या तलावात बुडालेले चर्च दिसू लागले आहे.
साउ गाव हे कॅटालोनिया प्रांतात आहे. येथे 4 दशकांमधील सर्वात भीषण दुष्काळ पडला आहे. पुढील काही महिन्यांमध्ये स्थिती आणखी बिघडू शकते अशी भीती हवामान तज्ञांनी व्यक्त केली आहे. याचमुळे प्रशासनाने लोकांना पाण्याचा मर्यादित वापर करण्याची सूचना केली आहे.
बार्सिलोना आणि माद्रिदनजीकच्या भागांना दुष्काळाची झळ बसू लागली आहे. यामुळे अनेक ठिकाणी सरोवरांनी तळ गाठला आहे. लोक कोरडय़ा नद्या, सरोवर आणि तलावांमध्ये आता पतंग उडवत आहेत. लोक अशाप्रकारच्या आटलेल्या तलावात जेव्हा उभे असतात, तेव्हा त्यांच्या नेव्हिगेशन ऍपवर तेथे पाणी दिसून येते, प्रत्यक्षात तेथे पाणी नसते.

दुष्काळामुळे वणव्यांचे प्रमाण वाढू शकते, तसेच उष्णतेची लाट येऊ शकते अशी भीती स्पेनच्या हवामान विभागाने व्यक्त केली आहे. उत्तर-पूर्व भूमध्यसमुद्राच्या आसपासचा भाग सातत्याने उष्ण होत आहे. याचा तडाखा आता कॅटालोनिया, बार्सिलोना आणि माद्रिदला बसत आहे.
हा भाग आता एकप्रकारे नो मॅन्स लँड ठरत चालला आहे. कारण येथे सातत्याने अटलांटिक आणि भूमध्य समुद्रामधून वादळं धडकत आहेत. या भागात उष्णतेची लाट येणे अत्यंत सामान्य आहे. मागील 12 महिन्यांमधील स्थिती ही 2017, 2012 आणि 2005 पेक्षाही प्रतिकूल आहे. कॅटालोनियाच्या जलाशयांमध्ये केवळ 27 टक्के पाणी शिल्लक आहे, असे स्पेनच्या हवामान विभागाचे प्रवक्ते रुबेन डे कांपों यांनी म्हटले आहे.
लोकांना घरांमध्ये 8 टक्के, उद्योगांना 15 टक्के आणि कृषीक्षेत्रासाठी 40 टक्क्यांची पाणीकपात करण्यास सांगण्यात आले आहे. बार्सिलोनापासून 100 किलोमीटर अंतरावरील साउ जलाशयात केवळ 10 टक्के पाणी शिल्लक राहिले आहे.









