ऑनलाईन टीम / तरुण भारत :
खारघर दुर्घटनेनंतर प्रशासनाला शहाणपण सुचलं आहे. यापुढे मोकळय़ा परिसरातील सर्व शासकीय कार्यक्रम हे 12 ते 5 या वेळेत न करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. खारघर येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कारादरम्यान घडलेल्या घटना भविष्यात टाळण्यासाठी शासनाने हे पाऊल उचललं आहे. यासंदर्भात जीआर काढण्यात आला आहे.
अप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवारी महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत भर उन्हात लाखो श्री सदस्य उपस्थित होते. यामधील जवळपास 600 जणांना उष्माघाताचा त्रास झाला. या दुर्घटनेत आतापर्यंत 14 श्री सदस्यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. त्यानंतर सरकारने अशा दुर्घटना टाळण्यासाठी मोकळय़ा परिसरात शासकीय कार्यक्रमाच्या वेळेबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे 12 ते 5 या वेळेत असे कार्यक्रम होणार नाहीत. राज्य सरकारकडून यासंदर्भात जीआर काढण्यात आला आहे.








