कॅम्प पोलिसांची मोहीम : कामगारांना त्रास
► प्रतिनिधी/ बेळगाव
गेल्या काही दिवसांमध्ये चोरीच्या घटना घडल्या आहेत. महिलांच्या गळ्यातील दागिनेही हिसकावून नेण्याचे प्रकार घडल्यानंतर कॅम्प पोलिसांनी आता रात्रीच्यावेळी ये-जा करणाऱ्यांचे ठसे घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र यामुळे कामगारांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
विजयनगर, हिंडलगा परिसरात महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून नेण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे रात्रीच्यावेळी कोणीही ये-जा करत असेल तर त्याचे ठसे घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. शौर्यचौक, महात्मा गांधी चौक या परिसरात पोलीस थांबून हाताचे ठसे घेत आहेत. यामुळे कामगारवर्गातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
परराज्यातून एखादी टोळी सक्रिय असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. यामुळे कॅम्प पोलीस स्थानकाच्या पोलीस निरीक्षकांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे, असे सांगण्यात आले.









