कुटुंबीयांचे सांत्वन करून नियोजित कार्यक्रमांसाठी रवाना , अनेक प्रकल्पांचे अनावरण
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबा शुक्रवारी पंचत्वात विलीन झाल्या. अखेरच्या प्रवासात पंतप्रधानांनी आपल्या आईच्या पार्थिवाला खांदा दिला. तसेच अंतिम प्रवासादरम्यान ते शववाहनात पार्थिवाजवळ होते. त्यानंतर अंत्यसंस्काराची प्रक्रिया पार पाडून ते पुन्हा आपल्या गांधीनगर येथील निवासस्थानी गेले. तेथे काही वेळ कुटुंबीयांसोबत घालवून ते आपल्या नियोजित कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले. आईच्या निधनाचे दुःख मनी बाळगत कामात व्यग्र होत त्यांनी आपल्या कर्तव्य आणि जबाबदारीचे भान दाखवून दिले.
आपल्या मात़ोश्रींच्या निधनानंतरही पंतप्रधान मोदींनी आपला कोणताही नियोजित कार्यक्रम रद्द केला नाही. अंतिम संस्कारानंतर ते थेट अहमदाबादच्या राजभवनात गेले. येथून ते पश्चिम बंगालमधील राष्ट्रीय गंगा परिषदेच्या बैठकीत सामील झाले. तसेच त्यांनी ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसला व्हर्च्युअल माध्यमातून हिरवा झेंडा दाखविला. पंतप्रधान नरेंद्र मोदी अंत्यसंस्कारानंतर सुमारे दीड-दोन तासांनी कामात रुजू झाले. यापूर्वी 1989 मध्ये आपल्या वडिलांच्या अंत्यसंस्कारानंतरही नरेंद्र मोदी यांनी वडनगर येथील पक्षाच्या बैठकीला तातडीने उपस्थित राहत आपल्या कर्तव्यदक्षतेचे दर्शन सर्वांना घडवले होते. त्यावेळी ते पक्षसंघटनेवर काम करत होते. आता पंतप्रधानपदी असतानाही त्यांनी आपल्या कर्तव्यनिष्ठेचे प्रेरणादायी दर्शन घडवले.
मला घडवण्याचे श्रेय आईचेच!
आपली आई निःस्वार्थी कर्मयोगी होती. तिने आपल्या साऱया आयुष्यात सद्गुण आणि मूल्यांची जोपासना केली. मी आज जो आहे, तो तिच्यामुळे आहे. आज एक देदिप्यमान शतकी आयुष्य परमेश्वराच्या चरणी लीन झाले आहे, अशी भावना पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली.
ः









