आंदोलन मिटविण्यासाठी सरकारशी चर्चा
वृत्तसंस्था/ कोलकाता
कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार-हत्येच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांना ममता बॅनर्जी यांनी सोमवारी चर्चेची शेवटची संधी दिली. बंगाल सरकारने सोमवारी संध्याकाळी 5 वाजता कनिष्ठ डॉक्टरांना बैठकीसाठी बोलावले होते. ममता सरकारने डॉक्टरांना पाचव्यांदा आमंत्रण पाठवल्यानंतर सोमवारी सायंकाळनंतर ही बैठक सुरू झाली. याआधी चारवेळा बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या. मात्र बैठकीचे लाईव्ह स्ट्रीमिंग आणि व्हिडिओग्राफी करण्याबाबत एकमत होऊ न शकल्याने त्या अनिर्णित राहिल्या होत्या. बंगाल सरकारने हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असल्याने व्हिडिओग्राफी आणि लाइव्ह स्ट्रीमिंग केले जाणार नाही, असे म्हटले आहे. दुसरीकडे, दोन्ही पक्षांना सभेची कार्यवाही रेकॉर्ड करण्याची परवानगी दिल्यास आपण त्यात सहभागी होण्यास तयार असल्याचे निवेदन ज्युनिअर डॉक्टरांनी जारी केले आहे.
कोलकाता येथील ज्युनियर डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी आंदोलक कनिष्ठ डॉक्टर आणि पश्चिम बंगाल सरकार यांच्यात चर्चेची पहिली फेरी सोमवार, 16 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कालीघाट येथील निवासस्थानी सुरू झाली. हे प्रकरण सोडवण्यासाठी चर्चा सुरू करण्याचे चार प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर कनिष्ठ डॉक्टरांचे शिष्टमंडळ एका महत्त्वपूर्ण बैठकीसाठी मुख्यमंत्री बॅनर्जी यांच्या निवासस्थानी पोहोचले. दरम्यान, बैठकीच्या तपशीलावर दोन्ही बाजू स्वाक्षरी करतील. तसेच, स्पष्टतेसाठी त्याच्या प्रती एकमेकांना दिल्या जातील, असे मुख्य सचिव मनोज पंत यांनी सांगितले.
आरजी कर मेडिकल कॉलेजमधील डॉक्टरच्या बलात्कार-हत्येनंतर ज्युनियर डॉक्टर सलग 38 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. त्यांनी सुरक्षा आणि वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष यांच्या राजीनाम्यासह 5 मागण्या मांडल्या आहेत. डॉक्टरांनी आपला विरोध संपवून कामावर परतावे, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते.









