मनपा कार्यालयाकडे घेतली धाव : दुपारपर्यंत वेतन देण्याच्या आश्वासनामुळे माघार
बेळगाव : महापालिकेच्या उद्यानामध्ये काम करणाऱ्या माळ्यांनाही तीन महिन्यांपासून वेतन देण्यात आले नाही. त्यामुळे त्यांनीही आयुक्तांच्या कक्षाकडे धाव घेतली व वेतन देण्याची मागणी केली. माळी कर्मचारी येताच तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांची समजूत काढून त्यांना माघारी धाडले. मात्र वेतनासाठी मनपासमोर आंदोलन करणाऱ्यांची संख्या आता वाढू लागली आहे. वेतन मिळाले नाही म्हणून चालकाने कामबंद आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. त्यांची समजूत आयुक्तांनी काढून काम करण्यास सांगितले. दुसऱ्याच दिवशी शहरातील उद्यानांमध्ये माळी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीही आंदोलन छेडले. सध्या गणेशोत्सवसह इतर सण साजरे करावे लागत आहेत. त्यामुळे पैशांची चणचण भासत आहे. ऐन सणातच वेतन नसल्यामुळे आम्ही अडचणीत आलो आहे. तेव्हा तातडीने वेतन द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. शहरातील सर्वच उद्यानातील कर्मचारी महापालिकेमध्ये दाखल झाले. त्यानंतर त्यांनी थेट मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्या कक्षाकडे धाव घेतली. कर्मचारी मोठ्या संख्येने असल्यामुळे गोंधळ उडाला. त्यानंतर साहाय्यक अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी चर्चा केली. दुपारपर्यंत वेतन जमा करू, असे आश्वासन दिले. याचबरोबर कोणताही गाजावाजा न करता तुम्ही पुन्हा कामावर जा, असे सांगितल्यामुळे कर्मचारी बाहेर पडले.









