पर्यटन व्यवसायाला फटका बसण्याची शक्यता
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंबंधी अश्लाघ्य टिप्पणी करणाऱ्या मालदीवच्या तीन मंत्र्यांमुळे भारत आणि त्या देशाच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाली आहे. आता त्या मंत्र्यांना काढून टाकण्यात आले असले, तरीही संबंधात निर्माण झालेली दूरी नाहीशी झालेली नाही. आता भारतीय पर्यटन व्यावसायिकांनीही मालदीव पर्यटनाच्या अनेक योजना आणि सवलती बंद केल्याने तेथील पर्यटन व्यावसायिकांची कोंडी झाली आहे. त्यामुळे सारवासारवी सुरु आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात करण्यात आलेल्या वक्तव्यांचा आम्ही निषेध करतो, असे निवेदन तेथील काही पर्यटन कंपन्यांनी प्रसिद्धीस दिले आहे. मालदीव देशाची अर्थव्यवस्था प्रामुख्याने पर्यटनावर अवलंबून असून हे पर्यटन बरेचसे भारतीय पर्यटकांवर अवलंबून आहे. मालदिवला जाणाऱ्या दर सहा पर्यटकांपैकी 1 जण भारतीय असतो. भारतीयांनी या देशात पर्यटन करणे बंद केल्यास या देशाच्या अर्थव्यवस्थेला फटका बसण्याची शक्यता आहे.
मोठ्या प्रमाणात भारतीय
गेल्या वर्षी मालदिवमध्ये 17 लाखांहून अधिक पर्यटक आले होते. त्यांच्यापैकी 2 लाख 9 हजार 198 भारतीय होते. त्याखालोखाल संख्या रशियन पर्यटकांची होती. तर तिसरा क्रमांक चीनचा होता. 1 लाख 87 हजार चीनी नागरीकांनी या देशाचे पर्यटक केले होते. भारतीय पर्यटकांची मोठी संख्या पाहता आता या देशाने वाद मिटविण्याच्या दिशेने प्रयत्न चालविले आहेत, असे दिसून येत आहे.
संघटनेची सारवासारवी
मालदीवमधील पर्यटन व्यावसायिक कंपन्यांची एक संघटना असून ती मालदीव असोसिएशन ऑफ टूरिझम इंडस्ट्री या नावाने ओळखली जाते. या संघटनेने नुकतेच एक व्यक्तव्य प्रसिद्धीस दिले असून भारताशी असलेले संबंध नेहमींच सुदृढ राहतील असा विश्वास प्रगट केलेला आहे. तसेच आमच्या देशातील जे कोणी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भारताविषयी अपोद्गार काढतील त्यांचा आम्ही कठोर शब्दांमध्ये निषेध करीत आहोत, असे संघटनेने स्पष्ट केले आहे.
मंत्र्यांचे निलंबन आणि हकालपट्टी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अपशब्दांचा उपयोग करणाऱ्या 3 उपमंत्र्यांना सोमवारी निलंबित करण्यात आले होते. या मंत्र्यांनी ‘एक्स’ या सोशल मिडिया मंचावरुन हे उद्गार काढले होते. नंतर या मंत्र्यांची तेथील मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आली होती. मंत्र्यांनी केलेली विधाने त्यांची व्यक्तीगत असून या विधानांचा मालदीवच्या धोरणाशी संबंध नाही. भारताशी मधुर संबंध ठेवण्याचेच आमचे धोरण आहे, असे स्पष्टीकरण मालदीवच्या प्रशासनाने दिले होते.
नववर्षातील प्रथम पर्यटक
दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झालेला असूनही सोमवारी एका नौकेतून काही भारतीय पर्यटक मालदीवला पोहचेलेले आहेत, असे तेथील पर्यटक व्यावसायिकांच्या संघटनेने घोषित केले आहे. मालदीव नेहमीच भारतीय पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज राहणार आहे, अशी पुस्तीही या संघटनेने जोडली आहे.
मालदीवला पर्याय लक्षद्वीप
मालदीवच्या आडमुठ्या भूमिकेमुळे तणाव निर्माण झाल्याच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी भारताच्या लक्षद्वीप बेटांचा दौरा केला आणि स्नॉर्कलिंगही केले. त्यामुळे या बेटांच्या पर्यटन क्षमतेला मोठा वाव मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नजीकच्या भविष्यकाळात लक्षद्वीप हा पर्यटकासाठी मालदीवला समर्थ पर्याय म्हणून समोर येईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. पर्यटनासाठी लक्षद्वीप हे मालदीवपेक्षाही आकर्षक आहे, असे मत आहे.