भाग्यनगर परिसरात बुधवारी काही कुत्र्यांना पकडले : मोहीम तीव्र राबविणे गरजचे
बेळगाव : भाग्यनगरात कुत्र्यांचे हल्ले वाढले आहेत. त्यामुळे त्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे. मंगळवारी एका कुत्र्याने वृद्धावर हल्ला केला आहे. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यानंतर तातडीने जागे झालेल्या महानगरपालिकेने बुधवारी या परिसरात भटक्या कुत्र्यांना पकडण्याची मोहीम राबविली आहे. गेल्या काही दिवसांपासून कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. हे हल्ले वाढतच आहेत. कणबर्गी रोडवर चार मुलांवर कुत्र्याने हल्ला केला होता. त्यानंतर काकती येथेही कुत्र्याच्या हल्ल्यात एक जण जखमी झाला. भाग्यनगर येथे देखील भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत. तेव्हा तातडीने कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. त्यानुसार महानगरपालिकेने बुधवारी या परिसरात कुत्र्यांना पकडून त्यांची रवानगी रुक्मिणीनगर येथील नसबंदी केंद्रामध्ये करण्यात आली आहे.
सर्वांनी सहकार्य करावे
भटक्या कुत्र्यांना पकडताना काही जण विरोध करत आहेत. मात्र हल्ला झाल्यानंतर हेच लोक तक्रार करण्यास पुढे येतात. तेव्हा सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. शहरामध्ये जवळपास 4 हजारांहून अधिक भटक्या कुत्र्यांची संख्या असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे तीव्र मोहीम राबविणे गरजचे आहे.









